
थेट WhatsApp वर मिळवा
समता नगर येथे सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेत भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी श्रद्धा हेच माणसाचे सर्वश्रेष्ठ धन असल्याचे प्रतिपादन केले.
स्थैर्य, विडणी, दि. ०५ ऑक्टोबर : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत समता नगर (विडणी) येथे सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेअंतर्गत न्यू पंचशील तरुण मित्र मंडळ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी ‘श्रद्धा हेच सर्वश्रेष्ठ धन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आलवक यक्ष यांच्या संवादाचा दाखला
तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आलवक यक्ष यांच्यात झालेल्या संवादाचा संदर्भ देत घोरपडे यांनी आपल्या मार्गदर्शनात महत्त्वाची माहिती दिली. आलवक यक्षाने तथागतांना विचारलेल्या चार प्रश्नांपैकी पहिला प्रश्न ‘जगातील सर्वश्रेष्ठ धन कोणते?’ असा होता. या प्रश्नाचे उत्तर देताना तथागतांनी ‘श्रद्धा हेच सर्वश्रेष्ठ धन आहे’ असा संदेश दिला. श्रद्धा म्हणजे केवळ अंधविश्वास नव्हे, तर त्या श्रद्धेनुसार आचरण करण्याचे धैर्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाह्य शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःच्या मनातील लोभ आणि मोहावर विजय मिळवणे अधिक महत्त्वाचे असते, असे त्यांनी दोन कथांच्या माध्यमातून उलगडून सांगितल्या.
बाबासाहेबांच्या विचारप्रवासात बुद्धधम्माचे स्थान
प्रवचनाच्या सुरुवातीस घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाततथागत भगवान गौतम बुद्ध कसे आले आणि त्यांच्या विचारप्रवासात बुद्धधम्माचे स्थान कसे दृढ होत गेले, याची सविस्तर मांडणी केली. बाबासाहेबांनी आपल्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातही बुद्धविचाराला केंद्रस्थानी ठेवत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ दिल्याचे त्यांनी नमूद केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे झालेली धम्मदीक्षा ही केवळ धार्मिक घटना नसून मानवी प्रतिष्ठा, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांचा स्वीकार करणारी ऐतिहासिक सामाजिक क्रांती होती, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विधी संचालन विठ्ठल निकाळजे यांनी केले, तर यावेळी महावीर भालेराव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.





