वेदाचार्य श्री घैसास गुरूजी वेदपाठशाळा, वेदभवनचा वर्धापनदिन महोत्सव सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | पुणे |
पुण्यातील प्रसिध्द असलेल्या वेदाचार्य श्री घैसास गुरूजी वेदपाठशाळा, वेदभवनचा वर्धापनदिन महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे शनिवार, १८ नोव्हेंबर २०२३ ते रविवार, २६ नोव्हेंबर २०२३ या काळात विविध कार्यक्रमांनी वेदभवनात साजरा होत आहे.

वेदाचार्य घैसास गुरूजी वेदपाठशाळा गेली ७६ वर्षे वेदांचे अध्ययन, अध्यापन, प्रचार आणि प्रसाराचे कार्य अव्याहतपणे करीत आहे. या वेदभवनाचा वर्धापनदिन प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. यामध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते.

या कार्यक्रमांमध्ये सकाळी ८ ते १ वाजेदरम्यान चतुर्वेदपारायणपूर्वक विविध देवतायाग, दुपारी १.३० वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी वेदपाठशाळेचे संस्थापक वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरूजी यांचा २६ वा स्मृतीदिन (श्राध्द) सकाळी आयोजित केला आहे. या साप्ताहिक कार्यक्रमात वेदपाठशाळेतर्फे प्रतिवार्षिक पूजा कथासंग्रह या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

शनिवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी या धार्मिक कार्यक्रमाची पूर्णाहुती सकाळी ११ वाजता होणार असून, रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वेदभवनाच्या पवित्र व रम्य परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात कीर्तन, प्रवचन इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमांसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून वेदमंत्रांचे श्रवण करून आशिर्वाद प्राप्त करून घ्यावेत व प्रसाद ग्रहण करावा, असे आवाहन वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसास गुरूजी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!