संस्थान काळापासून फलटणच्या राज्यकर्त्यांनी प्रागतिक विचारांचा जोपासलेला वारसा नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांनी वृद्धिंगत करावा – डॉ. सदानंद मोरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
स्वातंत्र्यपूर्व काळापासून फलटण हे महाराष्ट्रातील एक अग्रेसर संस्थान होते. येथील राज्यकर्त्यांनी प्रागतिक विचारांची कास धरून लोकशाही, शिक्षण, सामाजिक समता, औद्योगिकीकरण या गोष्टींचा ध्यास घेतला व या परिसराचा कायापालट केला. १९५७ मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी महाविद्यालयाची स्थापना करून उच्च शिक्षणाची द्वारे या भागातील शेतकर्‍यांच्या, मध्यमवर्गीयांच्या मुला-मुलींना उपलब्ध करून दिली. म्हणूनच आज प्रत्येक कुटुंबामध्ये या महाविद्यालयाच्या दोन-तीन पिढ्या सुशिक्षित, सुसंस्कृत होऊन उद्योग-व्यवसायाच्या नवनव्या संधी मिळवून जीवनात यशस्वी झाले आहेत. या महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी विविध पदांवर विराजमान झालेले असून या सर्वांच्या योगदानातून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मंडळ अधिक सदृढ करावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य संस्कृतीचे अध्यक्ष, प्रसिद्ध वक्ते, लेखक, कवी, इतिहास संशोधक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

शनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण व माजी विद्यार्थी मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माजी विद्यार्थ्यांना संबोधन करत होते. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा, पदाचा व त्यांच्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा काही भाग नव्या पिढीच्या उन्नतीसाठी दिला तर नोकरीच्या, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा आशावादही डॉ. मोरे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरूवात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करून झाले. प्रास्ताविक व अतिथी परिचय करून देत असताना माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव प्रा. डॉ. संजय दीक्षित यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये माजी विद्यार्थी मंडळाच्या माध्यमातून ज्या वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले गेले, त्याचा संक्षिप्त आढावा घेतला व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करून सर्वजण एकत्र येऊ व माजी विद्यार्थी या नात्याने या शिक्षण संकुलाला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला. मुधोजी महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षांमध्ये शैक्षणिक, शिक्षणपूरक उपक्रमांमध्ये केवळ शिवाजी विद्यापीठातच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारलेली असून क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत गेले व महाविद्यालयाचा नावलौकिक त्यांनी वाढवला. एनएसएस च्या माध्यमातून महाविद्यालयाचा परिसर व आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे मोठे काम केल्याने महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ महाविद्यालयास प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत माजी विद्यार्थी दिन साजरा करण्यात येईल व संपूर्ण दिवसभर माजी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल, असे जाहीर केले. माजी विद्यार्थ्यांनी अधिक सक्रिय होऊन महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासामध्ये योगदान देऊन महाविद्यालयास गुणवत्ता वाढविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. कदम यांनी केले.

यावेळी उपस्थित असणार्‍या माजी विद्यार्थ्यांपैकी अ‍ॅड. विश्वनाथ टाळकुटे, उच्च न्यायालय मुंबई यांनी महाविद्यालयीन जीवनातील काही आठवणी सांगितल्या व ते करत असलेल्या सामाजिक कार्याविषयी, त्याचबरोबर नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांसाठी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून ते करत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली, माजी विद्यार्थी मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, त्याचबरोबर फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी महाविद्यालयीन जीवनातील काही प्रसंग सांगून या महाविद्यालयाने त्यांना आयुष्यामध्ये ओळख व दिशा दिली.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांना योग्य ते संस्कार देऊन, शिस्त लावून त्यांच्यातील सुप्त गुणांची जाणीव करून दिली. त्यामुळेच आम्ही राजकारण, सहकार या क्षेत्रामध्ये चांगले काम करू शकलो, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. श्री. भोसले यांनी थाळीफेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी यासारख्या क्रीडा प्रकारांमध्ये विद्यापीठापर्यंत मजल मारल्याचा उल्लेख केला. या क्रीडा प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षापासून बक्षीस दिले जावे, त्यासाठी एक लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. माजी विद्यार्थी कु. प्राची बावळे, मुकुंद काणेकर यांनीही महाविद्यालयातील जीवनात मिळालेले ज्ञान, संस्कार त्यांना कसे उपयोगी पडले, हे विषद केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये आमदार दीपक चव्हाण यांनी पूर्वी महाविद्यालयामध्ये असलेली भौतिक सुविधांची कमतरता व त्यामध्ये झालेली वाढ, शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण होणारी नवनवी आव्हाने व त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजना, नव्याने सुरू केलेले विविध कौशल्य आधारित कोर्सेस व त्यातून निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी याचा उल्लेख केला. कोणत्याही क्षेत्रामध्ये चिकाटीने व प्रामाणिकपणे काम केल्यानंतर यश हे मिळतेच, त्यामुळे नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांची ओळख करून घ्यावी, आवश्यक ते कौशल्य प्राप्त करून घ्यावे व स्वयंरोजगार निर्माण करावेत. त्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ, शासनाकडून मिळणार्‍या सुविधा मिळण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर व प्रा. अभिजीत धुलगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या स्नेहमेळाव्यास महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य श्री. अरविंद मेहता, श्री. चंद्रकांत पाटील, प्रा. प्रदीप रत्नपारखे, उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक, माजी विद्यार्थी मंडळाचे सदस्य पत्रकार प्रा. रमेश आढाव, प्रा. वसंतराव वाघ, डॉ. बाळासाहेब कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील विभागप्रमुख, आजी माजी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक व मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर झालेल्या स्नेहभोजनाचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. कित्येक वर्षानंतर अनेक विद्यार्थी एकमेकांना भेटल्याने त्यांनी आपण शिकत असलेल्या वर्गांना भेटी दिल्या. ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण इत्यादी ठिकाणी असणार्‍या गतस्मृतींना उजाळा दिला. अशा कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करावे, अशी अपेक्षा अनेक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.

आभार माजी विद्यार्थी मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. नवनाथ रासकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!