फलटणमध्ये वर्षावास प्रवचन मालेला उत्स्फूर्त प्रतिसाद; धम्मप्रचाराचा मोठा संकल्प

भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखा आणि तथागत धम्मप्रचारक सेवा संघ यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचनाला उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाबासाहेब जगताप यांनी ‘वर्षावास म्हणजे काय?’ यावर सखोल मार्गदर्शन केले.

स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या माजी कार्यकारिणी आणि तथागत धम्मप्रचारक सेवा संघ राजाळे यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालेला बौद्ध उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘वर्षावास म्हणजे काय?’ या विषयावर प्रमुख प्रवचनकार बाबासाहेब जगताप यांनी सखोल मार्गदर्शन केले.

वर्षावासाचे महत्त्व आणि उद्देश

आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंतचा तीन महिन्यांचा कालावधी वर्षावास म्हणून पाळला जातो. भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मोपदेश दिल्यानंतर या परंपरेची सुरुवात झाली. मनातील राग, द्वेष आणि मत्सराचा त्याग करून मैत्री, करुणा आणि शील यांचे आचरण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे बाबासाहेब जगताप यांनी स्पष्ट केले.

धम्मप्रसारासाठी एकजुटीचे आवाहन

या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वांनी धम्मप्रचार आणि प्रसारासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन रामचंद्र मोरे यांनी केले. यावेळी विठ्ठल निकाळजे यांनी सम्यक भालेराव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचलन बजरंग गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महावीर भालेराव, राजेंद्र गायकवाड, आनंद जगताप यांच्यासह अनेक बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!