
थेट WhatsApp वर मिळवा
महसूल विभागाच्या डिजिटल उपक्रमामुळे वारस हक्क, मृत्युपत्र आणि हक्कसोड दस्तावेजांची नोंदणी प्रक्रिया सोपी झाली असून फेरफार एका दिवसात तयार होणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ११ ऑक्टोबर : राज्यातील नागरिकांना जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी महसूल कार्यालयांचे खोटे फेरे मारावे लागणार नाहीत. राज्य शासनाने वारस हक्क नोंदणी, मृत्युपत्र आणि हक्कसोड दस्तऐवजांच्या नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी होताच प्रणालीद्वारे नामांतराची प्रक्रिया आपोआप सुरू होईल आणि अवघ्या २४ तासांत फेरफार मंजूर होऊन नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ उतारा उपलब्ध होणार आहे.
महाभूमी पोर्टलद्वारे प्रक्रियेत पारदर्शकता
महसूल विभागाने तयार केलेल्या ‘ई-फेरफार’ प्रणालीमुळे नोंदणीकृत दस्तऐवज थेट ७/१२ उताऱ्याशी जोडले गेले आहेत. जमीन खरेदी-विक्री किंवा वारस हक्काची नोंदणी झाल्यावर ही माहिती थेट तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या प्रणालीवर उपलब्ध होते. यामुळे हस्तलिखित नोंदींमधील चुका, मध्यस्थांची लुडबूड आणि भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसणार असून सामान्य नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे.
नागरिकांना मिळणार जलद सेवा
यापूर्वी वारस हक्काची नोंद करण्यासाठी किंवा हक्कसोड पत्र देण्यासाठी आठवडे अन् महिने वाट पाहावी लागत होती. नव्या प्रणालीमुळे दस्त नोंदणीची माहिती ई-फेरफार पोर्टलमधून त्वरित अद्ययावत केली जाईल. सर्व प्रक्रिया पारदर्शक होणार असल्याने शेतकरी आणि जमीनधारकांना कोणताही मनस्ताप न होता तातडीने अधिकृत दाखले मिळणे सोपे झाले आहे.





