
थेट WhatsApp वर मिळवा
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले असून सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तुकाराम मुंढे यांची MPSC सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
स्थैर्य, पुणे, दि. ११ ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संदर्भात पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांची MPSC च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.
शिवेंद्रराजेंची आंदोलकांशी चर्चा
आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी विद्यार्थ्यांची आणि आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या वतीने मागण्या मान्य केल्याचा मसुदा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगत शिवेंद्रराजे यांनी तुकाराम मुंढे यांच्या MPSC सचिवपदावरील नियुक्तीची घोषणा केली.
गुन्हे मागे घेणार
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन शिवेंद्रराजे यांनी दिले. तसेच, MPSC प्रक्रियेत जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात गट ‘क’ पदांसाठी परीक्षा होणार असून, या पदसंख्येमध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी कायम
सरकारने दिलेल्या मसुद्यात MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याचे रोहित पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे भीमनवार यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.





