नवरात्रीच्या उपवासात भगर खाण्यापूर्वी ‘ही’ काळजी घ्या; विषबाधेतून बचावासाठी एफडीएचे महत्त्वाचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

नवरात्रीच्या उपवासात भेसळयुक्त किंवा शिळी भगर खाल्ल्याने अन्नविषबाधा होण्याचा धोका वाढल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ११ ऑक्टोबर : नवरात्रोत्सवाच्या काळात उपवासासाठी भगरीचा (वरई) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, ही भगर खरेदी करताना आणि शिजवताना योग्य काळजी न घेतल्यास अन्नविषबाधा (फूड पॉयझनिंग) होण्याचा मोठा धोका असतो. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत उपवासाच्या दिवशी भगर खाल्ल्याने अनेक नागरिकांना मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्यासारख्या त्रासाला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

भगर खरेदी करताना अन् शिजवताना काय काळजी घ्यावी?

एफडीएच्या माहितीनुसार, जुनी, दमट किंवा बुरशी लागलेली भगर खाल्ल्यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात. त्यामुळे नागरिकांनी नेहमी हवाबंद पाकिटातील आणि ॲफमार्क किंवा एफएसएसएआय (FSSAI) नोंदणीकृत ब्रँडचीच भगर खरेदी करावी. उघड्यावरील किंवा सुट्टी मिळणारी भगर खरेदी करणे टाळावे. भगर शिजवण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घेणे आणि योग्य प्रमाणात शिजवणे अत्यंत आवश्यक आहे.

अन्नविषबाधेची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्या

भगर खाल्ल्यानंतर पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब किंवा चक्कर येणे अशी लक्षणे आढळल्यास अजिबात दुर्लक्ष न करता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात उपचार घ्यावेत. व्यापारी आणि विक्रेत्यांनीही मुदत संपलेली किंवा खराब भगर विक्रीस ठेवू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अन्न प्रशासनाने दिला आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!