दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२३ | सातारा |
रहाटणी (ता. खटाव) येथे पुनर्वसन झालेल्या भानसेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी नागरी सुविधा द्याव्यात व स्थलांतरित न झालेल्यांचे भूखंड परस्पर विक्री होणे त्वरित थांबवावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भानसेवाडी (ता. खटाव) येथे ग्रामस्थांचे उरमोडी धरण प्रकल्पामुळे रहाटणी (ता. खटाव) या ठिकाणी पुनर्वसन झालेले आहे; परंतु गेले कित्येक वर्षे विस्थापित होऊनदेखील ग्रामस्थांना बर्याच नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. भानसेवाडीसह कासरस्थळ गावचेही या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे; परंतु त्या गावातील बहुतांशी खातेदार स्थलांतरित झालेले नाहीत. काही लोक त्यांचे भूखंड परस्पर विक्री करीत आहेत. त्यामुळे गावातील स्थानिक व बाहेरील क्षेत्र विकत घेऊन येणार्या लोकांमध्ये भविष्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदेशीरदृष्ट्या भूखंडाचा वापर न करता परस्पर विक्री करणे चुकीचे आहे. या सर्व गोष्टी त्वरित थांबविण्यात याव्यात व आम्हाला सर्व नागरी सुविधा पर्याय देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याची दखल घेऊन समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.