११ व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांची निवड

‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार’ लेखक प्रा. मिलिंद जोशी यांना तर ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार’ सुरेश वाबळे यांना प्रदान करण्यात येणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखा आयोजित व येथील श्री सद्गुरू प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने पार पडणार्‍या ११ व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शिवचरित्रावरील प्रसिद्ध तरुण वक्ते, साहित्यिक व युवा पिढीचे मार्गदर्शक प्रा. नितीन बानगुडे – पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या वर्षीचा मानाचा प्रतिष्ठित असा ‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार’ प्रसिद्ध वक्ते, लेखक व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना व ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार’ फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे (अहमदनगर) यांना या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले आणि कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी- बेडके, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या संमेलनातील विविध कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट करताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, सन २०१२ साली यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीपासून सुरू झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे या वर्षी ११ वे वर्ष असून या वर्षीचे हे एकदिवसीय संमेलन शनिवार, दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात वरील दोन्ही पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येतील. तसेच ‘यशवंतराव चव्हाणांचे साहित्य विश्व आणि आजचे साहित्य’ यावर प्रा. मिलिंद जोशी यांचे व ‘शिवशंभू, यशवंत विचारातून साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी’ यावर, प्रा. नितीन बानगुडे – पाटील यांचे ‘यशवंतराव चव्हाण यांचा सहकार विचार व आजची सहकार चळवळ’ यावर तर सुरेश वाबळे यांचे सद्य:स्थितीसाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. तसेच एरंडोल नगर परिषदेचे प्रशासक विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून एरंडोल (जि. जळगाव) येथे ‘पुस्तक बगीचा’ उभारला असून याबद्दल त्यांचा सत्कार व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त म.सा.प. सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांचे सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण पॅनल निवडून आल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार उद्घाटन समारंभात करण्यात येणार आहे.

या संमेलनाची वैशिष्ठ्ये सांगताना म.सा.प. शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे व कार्यवाहक ताराचंद्र आवळे यांनी सांगितले की, फलटण तालुक्यातील सर्व जुन्या – नव्या साहित्यिकांची सूची यावेळी उद्घाटन समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच संमेलनाच्या भोजनोत्तर दुसर्‍या सत्रात फलटण तालुक्यातील साहित्यिकांचे सत्कार सातारा येथील प्रसिद्ध कवी व साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते या संमेलन अध्यक्षांच्या उपस्थितीत होणार आहेत. त्यानंतर दु. २.३० ते ५.३० मध्ये प्रसिद्ध हास्य अभिनेते प्रा. राहुल कुलकर्णी (कोल्हापूर) यांचा ‘हसवेगिरी’ हा कोल्हापुरी ठसक्यातील लोकप्रिय एकपात्री धमाल विनोदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

नागरिकांनी, यशवंतराव चव्हाण विचारप्रेमी व साहित्यिक प्रेमी/रसिकांनी मोठ्या संख्येने या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!