
थेट WhatsApp वर मिळवा
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) रेशन वितरणासाठी ‘फेस ऑथेंटिकेशन’सह ५ नवीन आणि महत्त्वाच्या डिजिटल सुधारणांची अधिकृत घोषणा केली आहे.
स्थैर्य,सातारा, दि. ०२ ऑक्टोबर : देशभरातील आधार कार्डधारकांच्या सोयीसाठी आणि डिजिटल सेवा अधिक पारदर्शक बनवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ५ मोठ्या नवीन सुविधांची सुरुवात केली आहे. यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये (ePDS) रेशन मिळवण्यासाठी ‘फेस ऑथेंटिकेशन’ म्हणजेच चेहऱ्याच्या ओळखीद्वारे पडताळणी करण्याच्या सुविधेचा समावेश आहे. यामुळे बोटांचे ठसे न जुळल्याने रेशन मिळण्यात येणाऱ्या अडचणी आता पूर्णपणे दूर होणार आहेत.
चेहरा दाखवून मिळणार स्वस्त धान्य
अनेकदा शेतात किंवा कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांचे, तसेच वयोवृद्धांचे बोटांचे ठसे ई-पॉस (e-POS) मशिन्सवर स्कॅन होत नाहीत. त्यामुळे पात्र असूनही हजारो लाभार्थ्यांना रेशनपासून वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा म्हणून युआयडीएआयने अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग तसेच एनआयसीच्या सहकार्याने ही संपर्कमुक्त फेस ऑथेंटिकेशन प्रणाली कार्यान्वित केली आहे. आता लाभार्थीच्या संमतीने केवळ त्याचा चेहरा स्कॅन करून रेशन वितरण केले जाईल.
टोकन सिस्टीम आणि अद्ययावत वेबसाइट
याशिवाय युआयडीएआयच्या प्रादेशिक आणि राज्य कार्यालयांमधील गर्दी नियंत्रणासाठी नवी ‘टोकन मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. तसेच अशासकीय संस्थांसाठी अर्ज प्रक्रिया सोपी करणारे ‘SWIK २.०’ पोर्टल आणि लहान संस्थांसाठी ‘Sub-AUA (LITE)’ फ्रेमवर्क लाँच करण्यात आले आहे. नागरिकांना सहज माहिती मिळावी यासाठी युआयडीएआयची वेबसाइट अधिक सुटसुटीत करण्यात आली असून भाषिणी (BHASHINI) प्रणालीद्वारे आगामी काळात ही वेबसाइट २३ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.





