परराज्यात नोंदणी करून महाराष्ट्रात फिरणाऱ्या वाहनांवर आरटीओचा दणका; ४७५ वाहनांवर कारवाई

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्रात नियमित वापरल्या जाणाऱ्या परराज्यातील खासगी वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) विशेष मोहीम राबवत कारवाई केली असून, तपासणीदरम्यान नियमबाह्य ठरलेल्या ४७५ वाहनधारकांकडून २४ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २२ ऑक्टोबर : कमी वाहनकर असलेल्या दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव यांसारख्या केंद्रशासित प्रदेशांत नोंदणी करून महाराष्ट्रात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने कडक पावले उचलली आहेत. महामुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये आरटीओच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबवून वाहन कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आली.

विशेष मोहिमेत हजारो वाहनांची तपासणी

वाहतूक विभागाने ५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबवलेल्या या विशेष मोहिमेत एकूण ६ हजार ४०८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महागड्या स्पोर्ट्स व लक्झरी कारसह व्यावसायिक वाहनांचाही समावेश होता. तपासणीदरम्यान कागदपत्रे व कराची पूर्तता न केलेली ४७५ वाहने दोषी आढळली असून, प्रशासनाने तातडीने कारवाई करत १२ वाहने जप्त केली आहेत.

दंडात्मक वसुली आणि प्रशासकीय भूमिका

महाराष्ट्रात गाड्यांचा नियमित वापर होत असतानाही योग्य कर न भरणाऱ्या वाहनधारकांना चलन देण्यात आले. काहींनी तत्काळ कर भरल्याने त्यांच्याकडून २४ लाख ९ हजार १७८ रुपयांचा दंड व तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. परराज्यात नोंदणी करून राज्य शासनाच्या कराची चोरी करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!