एकाच सामन्यात दोन धक्के! आयसीसीने टीम इंडियावर ठोठावला मोठा दंड


 

स्थैर्य, दि.२८: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे झाला. या सामन्यात भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. पहिला धक्का म्हणजे त्यांना या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी पराभूत केले. दुसरा धक्का असा की, भारतीय संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने मोठा दंड ठोठावला.

खरं तर षटकांची गती कमी राखल्यामुळे (स्लो ओव्हर रेट) भारतीय संघावर आयसीसीने सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावला आहे. अमिराती आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी डेविड बून यांना विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने निर्धारित वेळेत आपली ५० षटके टाकली नसल्याचे समजले. जो वेळ दिला होता, त्यानुसार भारतीय संघाने एक षटक उशिराने टाकले. त्यामुळे संघावर हा दंड आकारण्यात आला.

आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार खेळाडू व खेळाडूंच्या सहकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे, जे षटकाच्या कमी गतीच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. अशामध्ये खेळाडूंना त्यांच्या सामना शुल्काच्या २० टक्के दंड आकारण्यात येतो. कारण त्यांना निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण करता आली नाही. विराटने ही चूक स्वीकारली आहे.

मैदानावरील पंच रॉड टकर, सॅम नोगाज्स्की, टीव्ही पंच पॉल रायफेल आणि चौथे पंच जेरार्ड एबूद यांनी भारतीय संघावर हे आरोप लावले होते. हे योग्य ठरले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा वनडे सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावरच होणार आहे, तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना कॅनबेरा येथे २ डिसेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!