प्रोटीन पावडर, हेल्थ सप्लिमेंट्स विक्रेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका; नियम मोडल्यास १० लाख दंड ते थेट जन्मठेप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यात बनावट प्रोटीन पावडर आणि हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर अन्न व औषध प्रशासनाने कडक नियमावली लागू केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २१ नोव्हेंबर : राज्यात तरुणांमध्ये वाढलेली बॉडीबिल्डिंगची क्रेझ आणि सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींमुळे प्रोटीन पावडर व हेल्थ सप्लिमेंट्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या उत्पादनांच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात कडक नियमावली लागू केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि सप्लिमेंट्समुळे मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेच्या शिक्षेचा इशारा देण्यात आला आहे.

जिम, केमिस्ट आणि इन्फ्लुएंसर्सवर करडी नजर

अन्न व औषध प्रशासनाने १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध आस्थापनांवर केलेल्या कारवाईत उत्पादनाच्या आवरणावर एक नाव आणि आतमध्ये भलताच घटक असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते. याची गंभीर दखल घेत आता उत्पादक, वितरक, आयातदार, औषध विक्रेते, जिम आणि हेल्थ सेंटर्स यांना एफडीएचा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक केले आहे. तसेच सोशल मीडियावर ‘झटपट शरीर बनवा’ किंवा ‘वजन घटवा’ असे खोटे दावे करणाऱ्या इन्फ्लुएंसर्सवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

नियम मोडल्यास होणार कठोर शिक्षा

हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असून त्यातून कोणताही आजार बरा होत नाही, त्यामुळे त्यांना औषध समजण्याची चूक करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नव्या नियमावलीनुसार सर्वसाधारण नियमांचे उल्लंघन केल्यास ५ लाख रुपये, तर दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास किंवा परवान्याविना व्यवसाय केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. विशेष म्हणजे, या सप्लिमेंट्सच्या सेवनाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधितांना थेट जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!