महाबळेश्वरच्या मातीत अमेरिकन स्ट्रॉबेरीचा नवा गोडवा; पण यंदा हंगाम लवकर आटोपण्याची भीती का?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाबळेश्वरमध्ये प्रथमच एन-कोअर आणि किओपॅट्रा या अमेरिकन स्ट्रॉबेरी जातींची लागवड झाली असून, ४० तास टिकणाऱ्या या फळांना बाजारात मोठी मागणी आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २१ नोव्हेंबर : ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत यंदा प्रथमच अमेरिकन स्ट्रॉबेरीचा नवा गोडवा रुजू लागला आहे. तालुक्यात पहिल्यांदाच ‘एन-कोअर’ आणि ‘किओपॅट्रा’ या अमेरिकन जातींची लागवड करण्यात आली असून, इजिप्तमधून आयात केलेल्या या रोपांनी लवकर फळधारणा देत शेतकऱ्यांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विदेशी रोपांची आयात आणि उत्पादनाची स्थिती

ही फळे टोकदार, रसाळ व चवीला गोड असून किमान ४० तास ताजी टिकून राहतात, त्यामुळे ताज्या फळांच्या बाजारपेठेत त्यांना मोठी मागणी आहे. यंदा तालुक्यात सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली असून त्यात ३० ते ३५ टक्के वाटा या नव्या जातींचा आहे. इटली, स्पेन आणि इजिप्तमधून मदर प्लांट मागवून त्यापासून डॉटर प्लांट तयार करून शेतात लावले जातात. एका रोपापासून ६०० ते ७५० ग्रॅम फळे मिळतात, मात्र ऑक्टोबरमधील उष्णतेमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन सुमारे १० टक्के रोपांचे नुकसान झाले आहे.

पर्यटकांना नवी चव, पण हंगाम लवकर संपण्याचे संकट

पूर्वी मोजक्या जातींपुरती मर्यादित असलेली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी शेती आता विंटर डाऊन, फोर्च्यूना, स्वीट सेन्सेशन आणि कॅमारोझा यांसह १४ विविध जातींपर्यंत विस्तारली आहे. यामुळे पर्यटकांना वेगवेगळ्या चवींच्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येणार आहे. दरम्यान, सध्या अनुकूल वातावरणामुळे फळे बाजारात येऊ लागली असली तरी एल निनो आणि खालावलेल्या पाणीपातळीमुळे यंदाचा हंगाम एप्रिल-मे ऐवजी जानेवारी-फेब्रुवारीतच संपण्याची भीती महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष किसन भिलारे यांनी व्यक्त केली आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!