संकटमोचक : श्री.रविंद्र बेडकिहाळ


‘पत्रकारिता हेच माझे जीवन आहे’ असे समजून उमजून त्यासाठी ध्येयवादाने आयुष्य वेचणारे जे काही थोडेफार पत्रकार, संपादक आहेत त्यात आदरणीय श्री.रविंद्र बेडकिहाळ यांचे नाव नक्कीच अग्रभागी घ्यावे लागेल. आपल्या पेशाशी आपण किती एकरुप होऊन काम करतो यावर त्यातील यश अवलंबून असते आणि हे करणे तसे फारसे अवघडही नसते. मात्र याबाबतीत पत्रकारिता हे क्षेत्र थोडे वेगळे आहे; असे मला वाटते. कारण, यात काम करताना व्यवसाय म्हणून अथवा पेशा म्हणून काम करुन चालत नाही. पत्रकारिता हे एक ‘ध्येय’ मानून जोपासावे लागणारे व्रत आहे. याच पद्धतीने ज्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरणकार्य व आपद्ग्रस्त पत्रकारांना मदत हे ‘ध्येय’ डोळ्यासमोर ठेवून आपली आजवरची संपूर्ण हयात खर्ची केली अशा आमच्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक व अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष, साप्ताहिक ‘लोकजागर’चे संस्थापक तथा लोकजागर परिवाराचे कुटूंबप्रमुख श्री.रविंद्र बेडकिहाळ यांचा आज दि.22 एप्रिल रोजी वाढदिवस संपन्न होत आहे.

पत्रकारांसमोर पत्रकारितेतील आव्हानांबरोबरच स्वत:चे संरक्षण, आपद्प्रसंगी आर्थिक मदत, पेन्शन, अधिस्वीकृती, पत्रकार भवन, पत्रकार वसाहत, वृत्तपत्रांची शासन मान्यता, जाहिरात दरवाढ असे एक ना अनेक प्रश्‍न उभे असतात. हे प्रश्‍न सोडवायचे असतील तर पत्रकारांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्रित येणे गरजेचे असते. पत्रकार संघटना वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचे प्रश्‍न एकच आहेत. त्यामुळे सर्व प्रश्‍न सुटेपर्यंत सर्वांनी एकत्र हा लढा सुरु ठेवणे हिताचे असते. नेमक्या याच भूमिकेतून राज्यातील पत्रकारांसमोर व विशेषत: छोट्या वृत्तपत्रांच्या संपादकांसमोर कोणतेही संकट आले तरी त्यांचे ‘संकट मोचक’ म्हणून श्री.रविंद्र बेडकिहाळ सर्वप्रथम धावून येतात. पत्रकारांना नेहमीच सहाय्य करण्याची भूमिका पार पाडून विधायक कार्यात ते आघाडीवर असतात. हे त्यांच्या सलग 50 हून अधिक वर्षाच्या पत्रकारितेतील सर्वात मोठे वैशिष्ठ्य आहे.

श्री.रविंद्र बेडकिहाळ यांनी 1987 साली महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेची फलटणसारख्या लहान शहरातून सुरुवात केली. आपद्प्रसंगी पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांना काही आर्थिक मदत तातडीने मिळावी हा या संस्था स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता आणि तो सार्थही ठरला. त्यानंतर श्री.रविंद्र बेडकिहाळ यांच्या संकल्पनेतून व या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वात प्रथम 1993 साली मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक प्रकल्पाचे काम बाळशास्त्रींच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे सुरु करण्यात आले. अनेकांचा विरोध व मोजक्यांची साथ अशा कठीण परिस्थितीत जे येतील त्यांना सोबत घेवून व जे विरोध करतील त्यांच्या शिवाय अशी ठाम भूमिका ठेवून श्री.बेडकिहाळ सरांनी जांभेकर स्मारकाचे काम पूर्ण केले. या स्मारक उभारणीचा इतिहास जर बारकाईने अभ्यासला तर त्यांची या कामातील चिकाटी थक्क करणारी अशीच आहे.

हे स्मारक कार्य सुरु असताना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या उभारणीत जो प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता तो कधीही त्यांनी मागे पडून दिला नाही. पूर्ण वेळ पत्रकारिता करणार्‍या पत्रकाराची आर्थिक स्थिती नाजूक असते. अशात कोणा पत्रकाराला मारहाण तर कुठे वृत्तपत्र कार्यालयाची तोडफोड, बातमीदारी करीत असताना अचानक अपघात, मोठा आजार, शस्त्रक्रिया असे आघात जर त्या पत्रकारावर झाले तर त्याच्या संपूर्ण कुटूंबाची वाताहत होते. अशा परिस्थितीत त्या पत्रकाराला आर्थिक आधार देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जमेल त्या पद्धतीने आजवर केले आहे. विशेष म्हणजे आजवर सुमारे तीनशेहून अधिक पत्रकारांना अशा स्वरुपाची मदत करुन देखील या मदतीची कोठेही प्रसिद्धी वा गाजावाजा करायचा नाही हा पहिल्यापासूनचा कटाक्ष त्यांनी पाळला आहे. हा सरांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल. सरांच्या या कार्यातील अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे पत्रकारांना अशा प्रकारे आर्थिक सहाय्य करण्याचे कार्य राज्यात सर्वप्रथम सरांनीच सुरु केले. त्यांच्यानंतर शासन म्हणून असे काही तरी आपणही केले पाहिजे ही सुबुद्धी महाराष्ट्र शासनाला तब्बल 20 वर्षांनंतर सुचली; यातच बरेच काही आले.

याच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून श्री.बेडकिहाळ सरांनी मराठी पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पत्रकारांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन म्हणून ‘दर्पण’ पुरस्कार देण्यास सुरुवात केली. संस्था स्थापनेपासून आजवर राज्यातील विविध भागातील 300 हून अधिक होतकरु व कर्तृत्त्ववान संपादक, पत्रकारांचा यथोचित गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे त्यांच्या जन्मगावी देण्यात येणार्‍या या पुरस्काराने आज वृत्तपत्रसृष्टीत सन्मानाची व प्रतिष्ठेची समाजमान्यता मिळवली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यानंतर अनेक वर्षांनी राज्यातील काही संस्था व महाराष्ट्र शासन यांनी बाळशास्त्रींच्या नावे पुरस्कार देण्यास सुरुवात केली, यातून सरांच्या या कार्याचे महत्त्व व दूरदृष्टी स्पष्ट होत आहे.

पत्रकारितेत प्रतिष्ठा आहे पण आर्थिक स्थैर्य नाही. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांना आपल्या निवृत्तीनंतरचा काळ अत्यंत हलाखीत घालवावा लागतो. अशा परिस्थितीत या ज्येेष्ठ पत्रकार, संपादकांना शासनाने निवृत्ती वेतन द्यावे या मागणीसाठी श्री.बेडकिहाळ सरांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या राज्यपातळीवरील संस्थांनी शासन दरबारी सलग 30 वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. शासनाने ज्येष्ठ पत्रकारांना आर्थिक सहाय्य म्हणून निवृत्ती वेतन द्यावे व या योजनेला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे अशीही आग्रही मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यासाठी शासनातले अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांना पत्र, निवेदन, उपोषणाचे इशारे यासह पंतप्रधान कार्यालयाचे दरवाजेही ठोठावले. सरते शेवटी 30 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांच्या या कार्यालाही यश मिळाले. शासनाने राज्यात ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ लागू केली. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू ज्येष्ठ पत्रकारांना मिळत आहे. इतकेच नाही तर तांत्रिक अडचणींमुळे अटी – शर्थी पूर्ण करता येत नसल्याने या योजनेपासून वंचित राहत असलेल्या पत्रकारांसाठी प्रशासकीय पातळीवर श्री.बेडकिहाळ सरांचा लढा आजही कायम सुरुच आहे. शिवाय नुकतीच शासनाकडून या सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मंजूर करुन घेण्यामध्येही श्री.बेडकिहाळ सरांचा फार मोठा पाठपुरावा आहे; आणि त्याचा मी साक्षीदारही आहे.

राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या संपादकांसाठी सन 1981 साली स्थापन झालेल्या व महाराष्ट्रात सहकारी तत्वावर कार्यक्षमरित्या सुरु असलेल्या वृत्तपत्र संपादकांच्या एकमेव अशा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या संस्थेचे श्री.बेडकिहाळ सर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सुमारे 43 वर्षांचा इतिहास असणार्‍या या संस्थेमार्फत जिल्हा वृत्तपत्र व संपादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून श्री.बेडकिहाळ सर करीत आहेत. यामध्ये शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांचे कुटूंबिय यांना शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेच्यामाध्यमातून वैद्यकीय सुविधा मिळवून देणे, महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात धोरणात बदल घडवून आणून शासनमान्य वृत्तपत्रांच्या जाहिरातदरामध्ये वाढ करणे, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांच्या होणार्‍या पडताळणीमधील वृत्तपत्रांना मारक असलेल्या वृत्तपत्रांचा आकार, खपाची संख्या, पृष्ठ संख्या, वर्षातील एकूण अंकांची संख्या, जाहिरात वितरण, वर्गीकृत जाहिरातींची संख्या, पडताळीसाठीची कागदपत्रे याबाबतच्या अटी रद्द होण्यासाठी श्री.रविंद्र बेडकिहाळ सर याही वयात राज्यातील तमाम वृत्तपत्र संपादक व मालकांचे नेतृत्त्व करीत आहेत.

सरांनी गत तीन वर्षे महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय ‘प्रसारमाध्यम व वृत्तपत्रे राज्य अधिस्वीकृती समिती’वर ही सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी या काळात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पत्रकार व संपादकांना अधिस्वीकृती पत्रिकेचा लाभ कसा देता येईल यासाठी परिश्रम घेतले. त्यासाठी अधिस्वीकृती पत्रिका देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचेही वारंवार सूचित केले. वृत्तपत्रांची अधिस्वीकृती पत्रिका देण्याची मर्यादा वाढवून त्याचा लाभ अधिकाधिक पत्रकारांना मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

वर्तमानपत्राबाबतच्या आजच्या आर्थिक गणितांचा विचार केला तर एखादे वृत्तपत्र चालविणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. वृत्तपत्राला अर्थार्जनाचे साधन म्हणून चालविले तरच ते चालविणे शक्य आहे. भांडवलशाही वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीयासमोर छोट्या वृत्तपत्रांना नगण्य किंमत दिली जात आहे. अशा भीषण परिस्थितीतही पदरमोड करुन नफा – तोट्याकडे कानाडोळा करुन लोकजागृतीचा वसा घेवून 17 मार्च 1980 रोजी सुरु झालेले साप्ताहिक लोकजागर 44 वर्षे अव्याहतपणे श्री.बेडकिहाळ सर चालवत आहेत. सरांनी जर मनात आणले असते तर त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या मदतीवर आपले हे वृत्तपत्र सहजरित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व त्यातून भरघोस उत्पन्नाचे साधन म्हणून निर्माण केले असते. मात्र पत्रकारितेतील मूल्यांची जोपासना करुन आपले वृत्तपत्र लहान तर लहान पण ते कोणाच्याही ताटाखालचे मांजर होऊन द्यायचे नाही ही रोखठोक भूमिका त्यांनी ‘लोकजागर’च्या बाबतीत ठेवली. पत्रकारिता व वृत्तपत्रसृष्टीप्रती असणारी त्यांची निष्ठा यामध्ये प्रकर्षाने दिसून येते. ग्रामीण भागातील कवि व साहित्यिकांसाठी फलटणमधून गेली 44 वर्षे दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सरांच्या जिद्दीमुळे होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून सातत्याने प्रकाशित होणार्‍या या दिवाळी अंकाची एका तरुण अभ्यासकाने शिवाजी विद्यापीठात आपल्या पीएच.डी. प्रबंधासाठी निवड केली आहे. हे या सातत्याचे यश आहे. समाजातील दुर्दम्य परिस्थिती नेमकेपणाने हेरुन त्यावर लिखाण करण्याची सरांच्या अंगी असलेली संपादकाची हातोटी आम्हाला ‘लोकजागर’चे काम करताना बरेच काही शिकवून जाते. वृत्तपत्र क्षेत्रात आज मला काम करत असताना सरांकडून सातत्याने मिळणारे ‘धडे’ माझ्यासाठी अनमोल असेच आहेत.

संवाद कौशल्य, कमालीची सकारात्मकता, समोरचा माणूस आपल्यापेक्षा वयानी व अनुभवानी कितीही लहान असला तरी त्याचे म्हणणे ऐकून घेणे, कार्यक्रम, योजना याबाबतचे आराखडे ठरवताना सर्वांची मते जाणून घेणे, सर्वांना निर्णय प्रक्रियेत सामील करुन घेणे, आपल्या हाताखालच्या माणसांना; आपल्याकडील कर्मचार्‍यांना बरोबरीने वागवणे सरांच्या अंगी असलेल्या या गुणांमुळे सरांनी हाती घेतलेले सर्वच उपक्रम ते सहजरित्या यशस्वी करतात. एखादी योजना मनात आलीच तर ती पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थच बसत नाहीत. मानापमानाच्या गोष्टी जिथल्या तिथे सोडून, हाती घेतलेल्या कामावर निष्ठा ठेवून, सहकारी मदतीला असोत अगर नसोत प्रसंगी ‘एकलो चलो रे’च्या भूमिकेत ते आपले काम अव्याहत सुरुच ठेवतात.

श्री.रविंद्र बेडकिहाळ आजवरच्या आपल्या आयुष्यातील बहुतांश काळ पत्रकारिता व त्यामाध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा समाजोपयोगी कार्यासाठी वाहिले आहे. असे व्यक्तिमत्व क्वचितच आपल्याला पाहायला मिळेल. शिवाय ते दररोज अनुभवायला मिळणे हेही भाग्याचेच म्हणावे लागेल. गेली 21 वर्षे मी सरांच्या सहवासात आहे. सरांमुळे पत्रकारितेसह इतर क्षेत्रात वावरण्याचा, काम करण्याचा अनुभव मिळत आहे. माझ्याबाबतीत शिक्षण व त्यानंतर पत्रकारिता आणि मुद्रण व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता मिळवून देण्याचे काम सरांनी केले आहे. अर्थातच पत्रकार व संपादक यांच्याप्रमाणे ते आमच्या परिवाराचेदेखील ‘संकट मोचक’च आहेत. आमच्या परिवारात कोणतीही समस्या उद्भवल्यास सर्वांचा पहिला फोन सरांनाच असतो आणि अर्थातच ती समस्या अत्यंत जबाबदारीने सर सहजरित्या सोडवतात. व्यवसाय असो वा कुटुंब प्रत्येक पाऊलागणिक सरांची लाभत असलेली आश्‍वासक साथ ही आम्हा सर्वांसाठी लाखमोलाची आहे. ती अशीच कायम राहणार यात शंकाच नाही.

आदरणीय सरांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा !

– रोहित वाकडे, 

संपादक, साप्ताहिक लोकजागर, फलटण.


Back to top button
Don`t copy text!