कराड हादरले; गुटखा दिला नाही म्हणून मुलाचा डोक्यात दगड घालून खून


दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२४ | कराड |
गुटखा दिला नाही म्हणून चिडून जाऊन एकाने १४ वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची भयानक घटना मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सलग दोन दिवसात कराड तालुक्यात खुनाच्या दोन घटना घडल्याने तालुका हादरला आहे. शनिवारी विजयनगर (ता. कराड) येथे युवकाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुंढे येथील कमानीसमोर रविवारी दुपारी १४ वर्षीय मुलगा व आरोपी यांच्यात गुटखा न दिल्याच्या कारणावरून वाद झाला होता, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. वादानंतर रागाच्या भरात आरोपीने मुलाला दगड मारला आणि तो दगड डोक्यात लागला. डोक्यात दगड लागल्याने त्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे.

खुनाच्या घटनास्थळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्यासह कर्मचारी यांनी भेट दिली असून पोलीस खुनाचा अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!