प्रशिक्षित विद्यार्थिनीचा विनयभंग, बारामती येथील वैमानिकावर गुन्हा दाखल


स्थैर्य, बारामती, 25 : कार्व्हर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड बारामती या राष्ट्रीय स्तरावरील खाजगी संस्थेतील पायलट प्रशिक्षकाविरोधात विनयभंग केल्याची तक्रार बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी चिफ पायलट विवेक आगरवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बारामती इथल्या कार्व्हर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी युवती वैमानिकाचं प्रशिक्षण घेत होती. तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या पालकांनी पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन पोलीस अधिक्षक पाटील यांनी याबाबत दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना चौकशीचे आदेश दिले होते. शर्मा यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार हा गुन्हा बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. शिवाय प्रशिक्षित विद्याथीर्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्व्हर एव्हिएशन प्रा.लि.बारामती इथे ही विद्यार्थिनी कर्मशियल पायलटचे प्रशिक्षण घेत होती. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थिनीचं सोलोचं प्रशिक्षण सुरू असताना, सीएफआय कॅप्टन विवेक फ्लाईंग करीत होते. यावेळी विद्यार्थिनीचा उजवा हात थ्रॉटलवर होता. त्यावेळी आरोपी पायलटनं विद्यार्थिनीचा थ्रॉटलवरील हात पकडला. यावेळी एअरक्राफ्टचे पावर कमी जास्त होत असल्याने, आरोपी पायलटने हात पकडला असेल म्हणून विद्यार्थीनी त्यांना काही बोलली नाही.

त्यानंतर 3 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी दीडच्या सुमारास परत विद्यार्थिनीला या आरोपीनं फ्लाईगसाठी नेलं. त्यावेळी त्यांनी पुन्हा तिचा हात पकडला व तिच्या दंडावर थोपटून ‘आप अच्छा कर रही हो’असं म्हटलं. त्यावेळी आरोपीने आनंदाच्या भरात स्पर्श केला असेल. असं समजून या विद्यार्थिनीन त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता पुन्हा तिला फ्लाईंगसाठी घेऊन गेले.

पण त्यानंतर हे प्रकार वारंवार होत असल्याचं लक्षात घेत पीडितेनं अनकम्फर्टेबल वाटत आहे असं सांगितलं. पण तरीदेखील गोष्टी थांबल्या नसल्यामुळे मुलीने कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहे.

याबाबत कार्व्हर व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, याप्रकरणाच्या चौकशीसाठी अंतर्गत कमिटीची नेमणूक केली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौकशीची प्रगती प्रलंबित असून यानंतर जो काही निर्णय येईल, तो आम्हाला मान्य असेल असं सांगण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचा मध्य प्रदेश इथला चिफ पायलट विवेक आगरवाल याचा शोध चालू आसल्याचं ग्रामीण पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!