स्थैर्य, पांचगणी, दि. १४ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य व पराक्रमाची साक्ष असलेला महाराष्ट्राचा अभिमान म्हणून ओळख असलेल्या किल्ले प्रतापगडाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लवकरच सुधारित विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार व ना. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर बैठक घेवून अंतिम रूप देवून तो तातडीने मंजूर करण्यात येणार आहे. या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ. मकरंद पाटील यांनी किल्ले प्रतापगडावर दिली.
मुसळधार पावसाने दोन दिवसापूर्वी किल्ले प्रतापगडाच्या दरड कोसळलेल्या तटबंदीची पाहणी करताना ते बोलत होते.आ. मकरंद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्यासमवेत किल्ले प्रतापगडास भेट दिली व दरड कोसळलेल्या तटबंदीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजू राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, प्रवीण भिलारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा शहर अध्यक्ष रोहित ढेबे व चंद्रकांत उतेकर उपस्थित होते.
किल्ले प्रतापगडाची दुरुस्ती व सुशोभीकरणाचा विकास आराखडा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2013 साली मंजूर केला होता. या आराखड्याचे काम चार टप्प्यात करण्यात येणार होते. या चारही टप्प्यातील कामासाठी आघाडी शासनाने 13 कोटी रुपये मंजूर केले होते. या पैकी पहिल्या टप्प्यासाठी 4 कोटी 65 लाख रुपयांचा निधी तातडीने वर्ग करण्यात आला होता. या पहिल्या टप्प्याचे काम कोकणातील बुटाला या ठेकेदारास दिले होते. या ठेकेदाराने नोव्हेंबर 2013 मध्ये सुरू केले होते. ज्या दर्जाचे काम होणे आवश्यक होते तसे दर्जेदार काम बुटाला ठेकेदाराने केले नाही. काम संथगतीने सुरू ठेवले, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अखेर 2018 मध्ये हे काम बंद करण्यात आले. आज आ. मकरंद पाटील यांनी मान्यवरांसह किल्ले प्रतापगडास भेट देवून कोसळलेल्या दरडीची तर पाहणी केलीच त्याच बरोबर 2013 ते 2018 या दरम्यान ठेकेदाराने किल्ल्यावर केलेल्या कामाचीही पाहणी केली. किल्ल्याची तटबंदी, बुरूज, चोर दरवाजे, मुख्य दरवाजे, तलाव, विहिरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व त्याचा चबुतरा, गडावरील पायर्या आदींची अगदी बारकाव्याने पाहणी केली. यानंतर हस्तकला केंद्र येथे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक पार पडली.
आ. मकरंद पाटील म्हणाले, अफजलखानाच्या रूपाने स्वराज्यावर पहिले संकट आले होते. या संकटावर मात करत असताना महाराजांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने इतिहास रचला. या इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. यासाठी पूर्वीचा विकास आराखडा रद्द् करून नवीन किल्ले प्रतापगड विकास आराखडा तयार करण्यात येईल. पूर्वीच्या आराखड्यात वीज पुरवठा व पायर्यांची दुरुस्ती या कामांचा समावेश नव्हता, अशा राहिलेल्या कामांचा समावेश सुधारित विकास आराखड्यात करण्यात येणार आहे. ना. अजित पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेवून किल्ले प्रतापगडाचा सुधारित विकास आराखडा सादर करण्यात येईल व त्यास त्याच बैठकीत मंजुरी देण्यात येईल. सध्या आपल्या देशात कोविड-19 चे मोठे संकट आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम झाला आहे. तरी देखील खास बाब म्हणून किल्ले प्रतापगडाच्या सुधारित विकास आराखड्यात उपलब्ध निधी मिळविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष सोंडकर, संदीप मोरे, सुरेश सपकाळ, सुरेश सावंत, विलास मोरे, विजय कासुर्डे, आनंद उतेकर, बबन कासुर्डे व अनिकेत रिंग उपस्थित होते.ऐतिहासिक किल्ल्याची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे हे साधारण ठेकेदाराचे काम नाही. यासाठी पौराणिक वास्तूंची माहिती असलेल्या व अशा कामाचा अनुभव असलेल्या खाजगी वास्तू विशारदाची आवश्यकता आहे.