स्थैर्य, फलटण दि.10 : ‘कोरोना’चा प्रसार अद्याप सुरु असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी यंदाची श्रीराम रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आले असल्याचे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी ‘स्थैर्य’शी बोलताना सांगितले. दरवर्षी यात्रा काळात फेरीवाले व दुकानदारांकडून लावण्यात येणार्या स्टॉल्सला यंदा बंदी घालण्यात आली असून हा आदेश मोडून जर कोणी स्टॉल लावल्यास त्यावर पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही काटकर यांनी यावेळी सूचित केले.
संस्थान काळापासून सुरू असलेल्या येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेस प्रतीवर्षी राज्याच्या विविध भागातून हजारो श्रीराम भक्त येत असतात. नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे 250 वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा फलटण नगरीत अव्याहत सुरु आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. यंदा मंगळवार, दिनांक 15 डिसेंबर रोजी रथाचा दिवस असून कोरोनाचे संकट लक्षात घेता साध्या पद्धतीने गर्दी टाळून उत्सव साजरा करावा लागणार आहे. भाविकांनी या दिवशी प्रशासनास सहकार्य करुन घरीच थांबून प्रभू श्रीरामांचे पूजन करुन ‘कोरोना’ मुक्तीचे साकडे घालावे व पुढल्या वर्षी पुन्हा दरवर्षीप्रमाणे उत्साहात रथोत्सव साजरा करावा, असेही आवाहन प्रसाद काटकर यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, रथोत्सवाच्या नियोजनासंबंधी प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत डॉ.शिवाजीराव जगताप यांनी श्रीराम देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी. सामाजिक अंतराचे पालन करावे. मंदीर परिसरात दिवसातून 2 वेळा निर्जंतुकीकरण करावे असे सांगून भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीस तहसिलदार समीर यादव, फलटण पोलीस निरीक्षक पी.डी.पोमण, फलटण नगरपरिषदेचे मुर्श्ताफ महात, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ यादव उपस्थित होते.