दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील केळी उत्पादन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ होण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केळी उत्पादक शेतकरी मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केळी उत्पादकांचे असणारे प्रश्न, केळी उत्पादनासाठी फलटण तालुक्याचे पोषक वातावरण तसेच फलटण तालुक्यातील केळी क्षेत्र व उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ व्हावी, असे आवाहन उपस्थित केळी उत्पादकांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगतशील शेतकरी श्री. रामदास कदम यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ट्रायडेंट केळी एक्सपोर्ट कंपनी प्रा.लि., मुंबईचे प्रमुख श्री. संजय वाघमारे उपस्थित होते.
डाळिंब उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब काटे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना डाळिंब उत्पादक संघाचे महाराष्ट्रातील कामकाज, शेतकरी व उत्पादक कंपनीची करार पद्धत, केळी एक्सपोर्ट कंपनीचे बारामतीतील कामकाज व शेतकर्यांना केळी उत्पादन वाढीसाठी मिळत असलेले मार्गदर्शन, या विषयावर सविस्तर माहिती दिली.
प्रमुख वक्ते श्री. संजय वाघमारे यांनी शेतकरी व कंपनीची करार पद्धत, हार्डनिंग सेंटर व कंपनीचे मार्गदर्शन, केळी उत्पादनातील पॅकहाऊस पद्धत, केळी पिकाचे होणारे नुकसान, केळी पिकातील शेतकर्यांना मिळणारा हमीभाव, केळी उत्पादन व्यवस्थापन, केळीची एक्सपोर्ट क्वालिटी, या विषयांवर उपस्थित केळी उत्पादकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बारामती फलोत्पादक संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव घनवट यांनी फलटण तालुक्यातील केळी पिकासाठी पोषक हवामान, शेतकर्यांचे केळी उत्पादनासंबंधी असणार्या अडचणी, केळी पिकासाठी फलटण तालुक्याचे पोषक पाणी व जमीन, या विषयांवर उपस्थित केळी उत्पादकांना माहिती दिली.
फलोत्पादक संघ, बारामतीचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद निंबाळकर यांनी केळी शेतीतील अनुभव, केळीचे विक्रमी उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञान, केळीला मिळणारा हमीभाव, या विषयांवर उपस्थित केळी उत्पादकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी दोन्ही महाविद्यालयांची सविस्तर माहिती दिली.
सदरील मेळाव्यासाठी श्रीराम सहकारी कारखाना प्रा. लि. फलटणचे चेअरमन श्री. बाळासाहेब शेंडे, फलोत्पादक संघ, बारामतीचे संचालक श्री. आबासो तावरे, जिल्हा परिषद, साताराचे सदस्य श्री. विश्वास गावडे, श्रीराम सहकारी कारखाना फलटणचे माजी संचालक श्री. अशोक शिंदे, सहकारी दूध संघ, फलटणचे अध्यक्ष श्री. धनंजय पवार व पंचक्रोशीतील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. जी. बी. अडसूळ यांनी केले.