महाराष्ट्रातील चार नाट्यसंस्थांचा सहभाग
स्थैर्य, मुंबई, दि. ०८ : लॉकडाउनच्या काळात सर्व लोक घरात बंदिस्त आहेत. कलावंत व रसिक यांचे नातं मात्र कायम आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमी ही एक प्रयोगशील रंगभूमी म्हणून देशभर ओळखली जाते. या लॉकडाऊन काळात रंगभूमीवर नाटकांचे सादरीकरण थांबलं असलं तरी कलावंतांच्या मनातील नाटक मात्र त्यांना अस्वस्थ करत आहे. आज लॉकडाउनच्या अटी काही प्रमाणात शिथील होत असल्या तरी नाट्यगृह बंदच राहणार आहेत. या काळात आपल्या आसपासच्या साधनांचा उपयोग करीत नवी वाट शोधण्याचा प्रयत्न कलावंत करीत आहेत.
यातीलच एक नवा ऑनलाइन नाट्य महोत्सव आयोजित होत आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील नाट्यसंस्था एकत्र येऊन “थिएटर प्रीमियर लीग २०२०” चे आयोजन करीत आहेत. नाट्यगृहात जाऊन नाटक पाहणे आज तरी रसिकांना शक्य नसल्याने घरी बसल्या बसल्या ऑनलाइन पद्धतीने या ‘थिएटर प्रीमिअर लीग २०२०’ मधील नाटकांचा आनंद रसिक घेऊ शकणार आहेत. थिएटर प्रीमियर लीग या अभिनव संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे काम अभिनेते, दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. या थिएटर प्रीमियर लीगचे आयोजन दि २४, २५ , २६ व २७ सप्टेंबर २०२० ला होणार आहे. या प्रीमियर लीगमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील संस्था सहभागी होणार असून यात कल्याण येथील अभिनय, कल्याण. रत्नागिरी येथील कलांश थियटर. जळगाव येथील परिवर्तन, जळगाव आणि मुंबई येथील प्रयोग, मालाड अशा चार संस्था सहभागी होणार आहेत.
नाटक हा जिवंत कलाप्रकार असून या थिएटर प्रीमियर लीगच्या माध्यमातून जगभरातील मराठी रसिक एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने या लीगमधील नाटके बघू शकणार आहेत. सतीश तांबे यांच्या रमायाबिन कथेवर आधारीत अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘परमेश्वरी पाहुणा’, श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारीत शंभू पाटील यांनी नाट्य रूपांतरित केलेलं आणि योगेश पाटील दिग्दर्शित हर्षल पाटील अभिनीत ‘नली’, इर्फान मुजावर लिखित मनोज भिसे दिग्दर्शित अजूनही चांदरात आहे आणि प्रदीप राणे लिखित प्रमोद शेलार दिग्दर्शित ॲश इज बर्निंग या चार नाटकांचा हा महोत्सव होत असून यात महाराष्ट्रातील ही उत्तम नाटके दररोज रात्री ८ वाजता सादर होणार आहेत. ज्याची तिकीट विक्री १० सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तिकीट दर प्रती नाटक ५५ रूपये आणि पुर्णोत्सव तिकीट दर १६० रुपये असेल. “थिएटर प्रीमियर लीग २०२०” द्वारे अशा प्रकारचा ऑनलाइन नाट्य महोत्सव महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत असून रसिकांसाठी ही पर्वणीच आहे. या लॉकडाउनच्या काळात कलावंत आणि रसिक यांचं नातं जोडणारा हा थिएटर प्रीमियर लीग २०२० नाट्य महोत्सव प्रेरक ठरू शकतो.
– शेखर बेन्द्रे