पोलीस कोरोना केअर सेंटर व बहुउद्देशीय हॉलचे उद्घाटन करताना सचिव यादव. समवेत फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व मान्यवर.
स्थैर्य, फलटण दि.११ : पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सदैव कार्यरत असतात. कोरोना संक्रमण काळात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून के.बी.एक्सपोर्टच्या माध्यमातून सचिन यादव यांनी पोलीसांसाठी सुसज्ज कोवीड केअर सेंटर व बहुउद्देशीय हॉल सुरु करुन दिला. त्यांचे हे सामाजिक कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी काढले.
फलटण शहर व तालुक्यामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, ज्यांनी कडक लॉकडाउन राबवून कोरोना ताब्यात ठेवला ते पोलीस मात्र दिवसागणिक कोरोना ने संक्रमित होऊ लागले. एक वेळ तर अशी आली होता की, शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी कोरोना संक्रमित झाले होते. त्या वेळेचे महत्व जाणून फलटण शहर पोलीस स्टेशनच्या जुन्या हॉलची के. बी. एक्सपोर्टचे डायरेक्टर सचिन यादव यांनी पाहणी करुन या हॉल मध्ये 10 कॉट, ऑक्सिजन सेवा, मॅट, लाईट्स, रंगरंगोटी करुन पोलीसांसाठी कोरोना केअर सेंटर सुरु करुन दिले. या कोवीड केअर सेंटर व बहुउद्देशीय हॉलचे उद्घाटन सचिन यादव यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी तानाजी बरडे बोलत होते.
कार्यक्रमास फलटण पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, पोलीस निरीक्षक भारत कींद्रे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सचिन यादव म्हणाले, कोरोना काळात सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचीही आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. ही बाब लक्षात घेवून के.बी.एक्सपोर्टने हे कार्य केले असून इथून पुढेही सामाजिक उपक्रमात के.बी.एक्सपोर्ट तत्पर राहणार असल्याचे सचिन यादव यांनी नमूद केले.
के.बी.एक्सपोर्टने केलेल्या या कार्यास सगुणामाता कन्स्ट्रक्शन, दत्तराज कुंभार, श्री.काळोखे व श्री.घनवट यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले आहे.