राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा


स्थैर्य,मुंबई, दि. ०३: जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. मुनगंटीवार यांच्या या मागणीला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हरकत घेऊन त्यांचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर संबंधित वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या.

राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही

त्यावर भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल. मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले.

मुनंगटीवारांची धमकी

मुनगंटीवारांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा इशारा देताच नवाब मलिक यांनी त्याला जोरदार हरकत घेतली. मुनगंटीवार हे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. सरकार हे संख्याबळावर चालतं. धमक्या देणं योग्य नाही, असं सांगतानाच हल्लीच्या काळात राजकीय उद्देश ठेवून काम सुरू आहे, त्यामुळे मुनंगटीवार यांचं वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी मलिक यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी मलिक यांची मागणी मान्य करत संबंधित विधान तपासून मुनगंटीवारांचं विधान कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं सांगितलं.

फडणवीसांकडून बचाव

मलिक यांनी मुनगंटीवारांच्या वक्तव्याला हरकत घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांचा बचाव केला. लोकशाहीत सरकार बरखास्त करू असं बोलण्याचा सदस्यांना अधिकार आहे. ही केवळ बातमी असती तर समजू शकलो असतो. पण या घटनेची व्हिडीओ क्लिप आहे. त्यामुळे तुम्ही संवेदनशीलतेने या घटनेवर कारवाई करावी यासाठी ही तळमळ आहे, असं फडणवीस म्हणाले.

दोन दिवसात चौकशी

दरम्यान, जळगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसात या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिलं.


Back to top button
Don`t copy text!