कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार!

मलेशियात होणार्‍या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात सहभाग


दैनिक स्थैर्य । 5 जून 2025। बारामती । विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती यांचा सांस्कृतिक संघ यंदाच्या ‘भारत उत्सव 2025’ या युवक महोत्सवात आपल्या अफाट कलाकौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. ऑल इंडिया डान्स, ड्रामा, म्युझिक अँड हॉकल फेस्टिवल यांच्या वतीने आणि अखिल लोककला सांस्कृतिक संस्था, पुणे यांच्या आयोजनात झालेल्या या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय महोत्सवात, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिका पाटी, वैयक्तिक लावणी नृत्य आणि मूकनाट्य या कलाप्रकारांना प्रेक्षकांनी व परीक्षकांनी भरभरून दाद दिली.

एकांकिका ’पाटी’ ही गेल्या वर्षभरात अनेक स्पर्धांमध्ये नावाजलेली कलाकृती असून, या महोत्सवातही तिने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे, महाविद्यालयाची विद्यार्थिनी तृप्ती खैरे हिने सादर केलेल्या लावणी नृत्य सादरीकरणाने उत्सवात उपस्थित सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले. तिच्या सादरीकरणाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा लक्षणीय आणि उत्स्फूर्त होता. त्याचबरोबर मूकनाट्य या कलाप्रकाराने देखील महत्त्वाचा ठसा उमटवला. या सर्व सादरीकरणांमुळे महाविद्यालयाच्या संघाला टीम ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे

या कामाची दखल घेऊन महाविद्यालयाचा सांस्कृतिक संघ आता मलेशिया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, ही अतिशय गौरवाची बाब आहे.

या यशस्वी प्रवासात विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. भरत शिंदे, संघ व्यवस्थापक डॉ. एच. एस. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमर भोसले, प्रा. विजय काकडे, यांचे मार्गदर्शन लाभले. संघाचे कलात्मक मार्गदर्शक आदेश यादव यांनी प्रशिक्षण व योग्य दिशा दिली. विद्या प्रतिष्ठानचा हा सांस्कृतिक झेंडा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकणार आहे.


Back to top button
Don`t copy text!