पब्लीक सब जानती है; पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम : शशिकांत शिंदे


 


स्थैर्य, सातारा, दि.२२ : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही
कार्यकर्त्याला वा पदाधिकाऱ्याला ताकद देण्यात पक्ष कुठेही कमी पडणार नाही,
असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी
येथे केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अलीकडच्या काळात
सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचे विश्‍लेषण करणारे
वृत्त “सकाळ’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांच्या भावनांना
वाट मोकळी करून दिली होती. या वृत्ताची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी
चर्चा झाली. त्यानंतर आमदार शिंदे यांनी सद्य राजकीय परिस्थितीमधील
राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका “सकाळ’शी बोलताना मांडली.

ते म्हणाले, “”विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद
पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी मला विधान परिषदेवर संधी दिली. सातारा जिल्ह्यात
कार्यकर्ता आणि पक्ष मजबूत राहावा, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अबाधित
राहावा याच हेतूने या सर्व वरिष्ठांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. ती
पार पाडण्याचा शंभर टक्के प्रयत्न मी करणार आहे.”

श्री. शिंदे पुढे म्हणाले, “”मी आधीच सूतोवाच केले होते, की आगामी काळातील
महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून
लढण्याचा निर्णय होईल आणि हे होत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा
पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात मी कमी पडणार नाही. नुकत्याच झालेल्या पदवीधर
आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही आम्ही सर्व नेते मंडळींनी एकत्रितपणे
काम करून यश मिळविले. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत सातारा जिल्हा
आघाडीवर राहिला, हे राज्याने पाहिले.”

“शिवेंद्रसिंहराजे भोसले पुन्हा स्वगृही येण्याबाबत पक्षपातळीवर काय चर्चा
सुरू आहे किंवा अजित पवार आणि त्यांची काही चर्चा झाली आहे का याविषयी मला
माहिती नाही. शिवेंद्रसिंहराजेंची आणि पक्षाची त्याबाबतची भूमिका स्पष्ट
झाली, की पक्षपातळीवर त्याचा निर्णय होईल. जरी तसा काही निर्णय झाला नाही,
तरी मेडिकल कॉलेजचे हे काम महाविकास आघाडीच्या सरकारनेच केलेले आहे, हे
साऱ्या जनतेला माहीत आहे,” असेही श्री. शिंदे यांनी नमूद केले. आगामी
निवडणुका महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशाच लढल्या जातील. असे सांगताना ते
म्हणाले, की पूर्वी ज्याप्रमाणे कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा लढती
व्हायच्या, ते दिवस आता राहिलेले नाहीत. त्यामुळे आघाडीतील प्रत्येक पक्ष
आपल्या ताकदीप्रमाणे निर्णय घेऊन एकत्रितपणे लढेल. महाविकास आघाडीतील घटक
पक्षांनीही याबाबत निर्णय घेताना जो आपल्या पक्षाशी प्रामाणिक असेल,
त्यालाच संधी द्यावी. पक्षात असूनही जो पक्षाबरोबर नसतो, त्यांना संधी
द्यायची का याबाबत विचार करावा. त्याचा फायदा भाजपला होऊ नये, याची काळजी
त्या त्या पक्षाने घ्यावी.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!