हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी बोलताना फलटणच्या आमदारांनी वस्तुस्थिती पाहायला हवी होती : महेंद्र सूर्यवंशी (बेडके)

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२६ | फलटण |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी जे वक्तव्य केले आहे, ते करण्याअगोदर त्यांनी वस्तुस्थिती जाणायला हवी होती. त्यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी म्हटले आहे.

महेंद्र सूर्यवंशी (बेडके) म्हणाले की, काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरील साध्या पोस्टवरून हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत आमदारांनी वक्तव्य करायला नको होते. ते ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात किंवा ज्यांच्यामुळे ते आमदार झाले त्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची किंबहुना घातपाताची चौकशीची साधी मागणीही अद्याप आमदार सचिन पाटील यांनी केलेली नाही. याबाबत त्यांनी विधानसभेच्या पटलावर मागणी करायला हवी होती. पण ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत, याबाबत त्यांनी खुलासा करावा.

खरे तर फलटण शहर व तालुक्यात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आमदार झाल्यानंतर जी काही आश्वासने दिली होती, ती त्यांनी आठवावीत आणि त्याची पूर्तता का होऊ शकत नाही, याचे आत्मपरीक्षण करावे. शहरातून सुरू असलेले पालखी महामार्गाचे काम, त्याचा दर्जा याची प्रचिती नुकत्याच झालेल्या विजेचे खांब पडण्याच्या घटनेतून आलेली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची साधी विचारपूसही आमदारांनी केल्याचे दिसून आले नाही. तसेच शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे व शेतकरी, बेरोजगार युवक यांच्याबाबतीत वेगवेगळे विषय आहेत त्याकडे त्यांनी सर्वप्रथम लक्ष द्यावे आणि अपुर्‍या माहितीवर आधारित वक्तव्य करून आपला राजकीय अपरिपक्वता त्यांनी तालुक्याला दाखवून दिलेली आहे, असेही महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी म्हटले आहे.

Back to top button
Don`t copy text!