मुधोजी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचा शैक्षणिक दौरा उत्साहात

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानबरोबर सामंजस्य करार : शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा

दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२६ | फलटण |
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य व प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाचा शैक्षणिक दौरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान व प्राणिशास्त्र या विभागांमधील शैक्षणिक, संशोधनात्मक व कौशल्याधारित उपक्रमांना चालना देण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार यावेळी करण्यात आला.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. त्यांच्यासमवेत खजिनदार हेमंत रानडे, सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, चंद्रकांत पाटील, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे, रजिस्ट्रार आर. वाय. गायकवाड, प्राणिशास्त्र विभागप्रमुख प्रा. कमल कुंभार व प्राणिशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शेखर फडतरे उपस्थित होते.

यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरा, आधुनिक पायाभूत सुविधा, संशोधनाभिमुख उपक्रम, गुणवत्ता वृद्धी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची माहिती पाहुण्यांना देण्यात आली.

या भेटीतील प्रमुख आकर्षण म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि प्राणिशास्त्र विभागांमध्ये शैक्षणिक व संशोधनात्मक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे विद्यार्थी व शिक्षक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळा प्रशिक्षण, इंटर्नशिप, कौशल्य विकास कार्यक्रम, कार्यशाळा, परिषद, परिसंवाद, संशोधन प्रकाशने, नवोपक्रम व उद्योजकता विकास अशा विविध उपक्रमांची संयुक्तपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यावेळी शिष्टमंडळाने महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन सुविधा, विभागीय उपक्रम तसेच गुणवत्ता वृद्धी व नवोपक्रमाशी संबंधित विविध प्रकल्पांची पाहणी केली. दोन्ही संस्थांतील प्राध्यापकांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन सहकार्य, विद्यार्थी विकास, उद्योग-शिक्षण दुवा आणि भविष्यातील संयुक्त उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे व संशोधन संस्कृतीचे कौतुक करत, हा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी दीर्घकालीन आणि फलदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. पी. एच. कदम यांनी उच्च शिक्षणामध्ये संस्थात्मक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत ज्ञान, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता स्पष्ट केली.

प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी मनोगतात सांगितले की, शैक्षणिक संस्थांमधील परस्पर सहकार्य, संशोधन संस्कृतीची जोपासना, ज्ञानाची देवाणघेवाण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम हीच गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची खरी दिशा आहे. हा सामंजस्य करार विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांसाठी नवी संधी निर्माण करणारा ठरेल.

यावेळी डॉ. संजय सूर्यवंशी, सूक्ष्मजीव शास्त्र पदव्युत्तर समन्वयक, प्रा. नीलिमादेवी, डॉ. तुषार बोरसे, जैवतंत्रज्ञान, पदव्युत्तर समन्वयक, डॉ. कल्पना चंद्रमोरे, समन्वयक, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रा. नीलिमा पेंढारकर, डॉ. राजेश शर्मा, विभाग प्रमुख जैवतंत्रज्ञान विभाग, डॉ. रवींद्र गायकवाड, विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप पाटील, उपप्राचार्य, डॉ. गजानन जोशी, उपप्राचार्य कला शाखा प्रा. डॉ. शामराव घाडगे आणि तिन्ही विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!