
मृद नमुने घेण्याची पद्धत प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना समजावून देताना कृषी सहाय्यक योगेश भोंगळे व अमोल सपकाळ.
स्थैर्य, फलटण दि. ५ : जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रीय व रासायनिक खतांचा संतुलित वापर, वरचेवर जमिनीची मशागत, जमिनीची धूप झाल्याने होणारे अन्नद्रव्ये व जैव विविधांचे नुकसान टाळणेसाठी धूप होणार नाही यासाठी योग्य दक्षता घेण्याची आवश्यकता मंडल कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी निदर्शनास आणून देत काळ्या आईचे ऋण व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत फलटण तालुका कृषी अधिकारी कार्यलयाचे माध्यमातून सोनगाव, ता. फलटण येथे जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमोल सपकाळ बोलत होते. यावेळी माजी सरपंच जयाप्पा बेलदार, पोपटराव बुरुंगले, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित शेतकरी दत्तात्रय ननावरे, विकास सोसायटी चेअरमन रामचंद्र पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे, माऊली थोरात, राजेंद्र बुरुंगले, अक्षय थोरात, शहाजी सुळ, दत्तात्रय कदम, विलास वरकडे, शत्रुघ्न थोरात यांच्यासह सोनगाव व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
वरचेवर माती परीक्षण केल्याने जमिनीतील उपलब्ध अन्न द्रव्यांचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्याने अतिरिक्त वापर टाळून जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवता येते, जमिनीतील जैव विविधतेचे संरक्षण करुन सुपीक व उपजाऊ जमीन पिढ्या- न-पिढ्या सुरक्षीत ठेवता येईल असा विश्वास अमोल सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
कृषी सहाय्यक योगेश भोंगळे यांनी मृदा नमुना घेण्याची पद्धत उपस्थित शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह समजावून देत चाचणी अहवाल वाचन व समस्याग्रस्त जमिनीची सुधारणा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी प्रगतशील शेतकरी हणमंत थोरात यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात मृदा दिनाविषयी विवेचन केले.
बाळासाहेब लवटे यांनी सूत्रसंचालन आणि संजीव वाघमोडे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.