दिगंबर आगवणेंचा राजकारणात ‘कम बॅक’? विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीसाठी काम केल्याची चर्चा


 

स्थैर्य, फलटण दि. ६ : गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर राजकारणातून काहीसे ‘नॉट रिचेबल’ झालेले फलटण तालुक्याचे युवा नेते दिगंबर आगवणे यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधान परिषद पुणे विभाग पदवीधर व शिक्षक निवडणूकीत विजयी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी काम केले असल्याची चर्चा सुरु असून तालुक्यातील आगामी निवडणूकांसाठी ते पुन्हा एकदा राजकारणात दमदार ‘कम बॅक’ करण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तृळात बोलले जात आहे.

विधानसभा निवडणूकीपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत दिगंबर आगवणे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्वत:ची स्वतंत्र प्रचारयंत्रणा राबवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या चिन्हावर दिगंबर आगवणे यांनी लढून राष्ट्रवादीच्या आमदार दीपक चव्हाण यांना चांगले आव्हान दिले. मात्र आगवणे यांना विजय मिळवता आला नाही. त्यानंतर दिगंबर आगवणे कुठल्याच राजकीय कार्यक्रमात अथवा आंदोलनात दिसून आले नाहीत. शिवाय त्यांनी कुठली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघासाठी व पुणे शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिगंबर आगवणे यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या भरपूर मदत केली असल्याची चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने दिगंबर आगवणे राजकारणात पुन्हा सक्रीय झाले असून तालुक्यात आगामी काळात होणार्‍या निवडणुकीमध्ये ते ताकदीने उतरणार असल्याचे त्यांचे खंदे समर्थक सांगत आहेत.

आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासोबतच पुढील वर्षी फलटण नगरपरिषद व त्यानंतर काही दिवसातच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका पार पडणार आहेत. हे सगळे आगामी राजकीय आखाडे लक्षात घेवून राजकारणापासून थोड्या कालावधीसाठी अलिप्त राहिलेले दिगंबर आगवणे पुन्हा सक्रीय होत असल्याचे बोलले जात असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार असून यानिमित्ताने कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत संधी खुणावत आहे.

याबाबत दिगंबर आगवणे यांना छेडले असता दिगंबर आगवणे यांनी स्पष्ट केले की, तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार्‍या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपले राजकारण व समाजकारण नेहमीच सुरु राहणार आहे. तालुक्यातील आगामी सर्व निवडणूका कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुर्ण क्षमतेने लढवण्याचा आमचा मानस आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!