मसूर ग्रामपंचायतीची इमारत आता होणार इतिहासजमा


स्थैर्य, मसूर, दि. ०१ (गजानन चेणगे)  : मसूरच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देत उभी असलेली, असंख्य उन्हाळे – पावसाळे पाहिलेली, किमान तीन पिढ्यांच्या हृदयात कोरली गेलेली, यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील, शाहीर अमर शेख यासारख्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या ऐतिहासिक सभांची साक्षीदार असलेली आणि कित्येकांच्या हृदयसिंहासनावर अत्तराच्या कुपीसारखी विराजमान असलेली मसूर ग्रामपंचायतीची इमारत आता इतिहासजमा होणार आहे. ग्रामपंचायतीची नवीन वास्तू उभारण्यासाठी ही ऐतिहासिक वास्तू उतरण्यात येणार आहे. शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२०) रोजी ही वास्तू उतरवण्याचे काम सुरू होणार आहे.

मसूर हे कराड तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्य लढ्यात या भागातील चळवळीचे हे मुख्य केंद्र होते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्यासाठीच्या युध्दात मसूरच्या स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्या काळात, म्हणजे १९४० साली मसूर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. सुरूवातीच्या काळात स्वातंत्र्य सैनिक प्रतापराव जगदाळे तथा दादा यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. त्यांच्याच काळात मसूर बाजारपेठेत भुईकोट किल्ल्याला लागून ही ग्रामपंचायतीची पूर्वाभिमुख दगडी इमारत बांधली होती.

घडीव दगडात बांधलेल्या या टुमदार, चिरेबंदी वास्तूने असंख्य उन्हाळे – पावसाळे पाहिले, भूकंप पचवले. पण इमारतीचा चिराही हलला नाही. इतकेच काय, त्याचा टवकाही उडाला नाही. भव्य, विस्तीर्ण आवार, त्यामध्ये बाजारासाठी खूप पूर्वी बांधलेले कठडे, सुयोग्य उंचीवर ग्रामपंचायतीचे प्रवेशद्वार, त्यापुढे त्याची शोभा वाढवणारे व्यासपीठ, बाजुला मैदान व स्वतंत्र व्यासपीठ या सर्वच गोष्टींमुळे ग्रामपंचायत इमारतीच्या सौंदर्याला ‘चार चाँद’ लागले आहेत. किमान तीन पिढ्यांच्या हृदयात या वास्तूची प्रतिमा कोरली गेली आहे. किंबहुना या इमारतीशी प्रत्येक मसूरकराचे भावनिक नाते जोडले गेले आहे. ही इमारत मसूरची ‘ओळख’ झाली आहे.

मसूर ग्रामपंचायतीच्या दारात यशवंतराव चव्हाण, क्रांतीसिंह नाना पाटील, शाहीर अमर शेख यासारख्या लोकोत्तर नेत्यांच्या सभा झाल्या आणि गाजल्याही. याशिवाय कितीतरी ज्ञात – अज्ञात दिग्गज लोकांच्या सभा या इमारतीने पाहिल्या असतील. नंतरच्या काळात क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या सभांचीही ही वास्तू साक्षीदार राहिली आहे. या इमारतीने स्वातंत्र्यावेळचा इथला अंगार पाहिला, गुणवंत पाहिले, गुणगौरव पाहिला, नेतृत्व पाहिले, कर्तबगारी पाहिली आणि ही इमारत धन्य धन्य झाली.

प्रतापराव दादा यांच्यापासून सुरू झालेली सरपंचपदाची परंपरा पुढे हिंदुराव जगदाळे (हिंदुराव आबा), रतनचंद शहा, संपतराव बर्गे, दत्तू पाटील, धोंडिराम शिरतोडे, दत्तात्रय महाजन, वसंतराव जगदाळे, रायचंद शहा, मानसिंगराव जगदाळे अशा द्रष्ट्या नेत्यांनी सक्षमपणे चालवली. मानसिंगराव जगदाळे यांनी १९८९ पासून २००४ पर्यंत तब्बल १५ वर्षे सरपंचपद भूषवताना मसूरचा लौकिक वाढवण्याचे काम केले. अनेक भरीव कामे केली. त्यानंतर अलीकडे विद्या पाटील, प्रकाश माळी, अण्णा शिरतोडे, रेखा वायदंडे, सुनिता मसूरकर यांनाही मसूरच्या सरपंचपदाचा बहुमान लाभला. सध्या पंकज दीक्षित हे सरपंच आहेत. मसूरचे पहिले लोकनियुक्त सरपंच असा मान त्यांना मिळाला आहे. 

मसूरने मानसिंगराव जगदाळे यांच्या रूपाने जिल्ह्याच्या राजकारणात एक मजबुत नेतृत्व दिले आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे ते सभापती असून विविध माध्यमातून ते मसूरसाठी कामे आणत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, गटर्स यासह विविध आघाड्यांवर मसूर ग्रामपंचायतीचे सुरू असलेले काम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. मसूरचा वाढता विस्तार व कामाचा वाढता व्याप या पार्श्वभूमीवर मानसिंगराव जगदाळे यांच्याच प्रयत्नातून मसूर ग्रामपंचायतीची नवी इमारत उभारण्याचे काम सुरू होत आहे. 

सध्याची इमारत उतरवून त्या जागी तीन मजली बहुउद्देशीय इमारत उभी राहणार आहे. या इमारतीत तळमजल्याच्या ठिकाणी स्टोअर, ग्रामपंचायतीच्या वाहनांसाठी पार्किंग असेल. वर ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचे दालन, मिटिंग हॉल, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. याव्यतिरिक्त या वास्तुत तलाठी, मंडल अधिकारी, कृषी अधिकारी यांची कार्यालये असणार आहेत. नवी इमारत उभारण्यासाठी सुमारे दीड कोटी रूपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी जवळपास एक कोटी रूपये जिल्हा ग्रामीण विकास निधीतून कर्जरुपाने घेण्यात येणार आहेत.

इमारत पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार असून तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कामकाज चावडी चौकात असलेल्या जनावरांच्या दवाखान्याच्या इमारतीत चालणार आहे. शनिवारी मसूर ग्रामपंचायतीची जवळपास ७० – ७५ वर्षाची जुनी इमारत उतरवण्याचे काम सुरू होत आहे. त्यामुळे मसूरकरांच्या हृदयात कालवाकालव नाही झाली तरच नवल. त्याच्या पुढच्या शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते नवीन इमारतीचे विधिवत भूमिपूजन करण्यात येणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!