ग्रेड सेप्रेटरमध्ये राहणार 16 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच


स्थैर्य, सातारा, दि.१६: पोवई नाक्यावरील ग्रेड सेप्रेटरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी सातत्याने होत होती. ग्रेड सेपरेटर सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरित होताच पालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने सेपरेटरच्या चार अंर्तगत मार्गावर तब्बल 16 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ग्रेड सेप्रेटेरमधील सर्व भागात सीसीटीव्ही वॉच राहणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातारा पालिकेकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वीच सातारा पालिकेचा विद्युत विभाग उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या सूचनेनुसार आधीच कामाला लागला होता. शाहू चौक ते प्रांत कार्यालय, प्रांत कार्यालय ते पंचायत समिती, प्रांत कार्यालय ते वाय सी कॉलेज या सर्व मार्गिकांवर तब्बल 16 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ग्रेड सेपरेटरवरील अनेक जण विरुद्ध दिशेने जात होते. तसेच भरधाव वेगात असणार्‍या वाहनांमुळे अपताची शक्यता व्यक्त होत होती. तसेच सीसीटीव्ही नसल्याने गैरप्रकार होण्याचीही संभावना होती. तथापि, सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या टप्प्यात अंतर्गत सर्व रस्ते आल्याने गैरप्रकारांना आळा घालता येणार आहे.

सीसीटीव्हीचा कंट्रोल रूम तात्पुरत्या स्वरूपात पोवई नाक्यावरील रजताद्री हॉटेलजवळल एका विस्तारित कक्षामध्ये देण्यात आला आहे. या कक्षातूनच ग्रेड सेपरेटरच्या अंर्तगत वाहतुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. ग्रेड सेपरेटरच्या विद्युत दिव्यांसाठी बॅक अप म्हणून युध्दपातळीवर महाराजा सयाजीराव विद्यालय समोरील मैदानालगतच्या पालिकेच्या मोकळ्या जागेत लवकरच पॉवर जनरेटरची सोय करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!