सरकारने लॉकडाऊनचा रद्द करून एसटी सुरू करावी


 

‘वंचित‘चे वतीने डफली वाजवून आंदोलन 

स्थैर्य, सातारा, दि. 12 : देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाने अगदी थैमान घातले असताना त्याला रोखण्यासाठी काही नियोजन नसतानासुध्दा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्या कालावधीत उपाय योजना करण्यात सरकार पूर्णपणे अपशयी ठरले आहेत. त्यामुळे लोकांचे भूकबळी जाण्यापेक्षा सततचा लॉकडाऊनचा पर्याय रद्द करून शासनाने कोरोना नियंत्रणावर लक्ष द्यावे. तसेच एसटी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी वंचित आघाडीच्या वतीने डफली आंदोलन करण्यात आले.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात उपाययोजना करणे आवश्यक होते ते करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. जनतेला दिलासा देण्याकरीता अनेक उपाय योजना सुचविल्या. त्यावरही सरकारने काही केले नाही. मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधाही उभारू शकले नाही. त्यामुळेच सततचा लॉकडाऊन करूनही कोरोना वाढतोच आहे. याचा विचार करून सरकारने लॉकडाऊनचा पर्याय झुगारून जनतेला चांगली आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे. चार महिन्यात कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर तज्ज्ञ या निष्कर्षापर्यंत आलेले आहेत की कोरोना विरुध्द लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 टक्के लोकांनी दाखवली आहे. 15 टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत तर 5 टक्के लोक अद्ययावत वैद्यकीय उपचार घेऊनही नियंत्रणात आणता येत नाहीत. वैद्यकीयदृष्ट्या त्यांची तब्येत गंभीर होत आहे. सरकारने या 20 टक्के लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरोना नियंत्रणाचे हे सुत्र ठेवले पाहिजे. त्यामुळे 100 टक्के लोकांवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. 80 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार महिन्याचा आढावा घेऊन सरकारने हा निर्णय तातडीने घेतला पाहिजे. पण केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाही, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवून निषेध आंदोलन घेण्यात येत आहे.

राज्यातील एस.टी. सेवा व महानगरातील सार्वजनिका बस सेवा तात्काळ सुरु झाल्या पाहिजेत. ही प्रमुख मागणी घेऊन वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जनतेच्या हितासाठी या आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राज्यात एस. टी. सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!