दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२३ | फलटण |
ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार (मुकादम) यांच्या फसवणुकीमुळे संपूर्ण साखर उद्योग संकटात सापडला आहे. यातून योग्य तोडगा निघाला नाही तर ठेकेदार (मुकादम), वाहनचालक, साखर कामगार, ऊस उत्पादक शेतकरी वगैरे सर्व घटकांवर मोठे आर्थिक संकट येऊन त्यातून उपासमार आणि प्रसंगी आत्महत्येची वेळ येणार असल्याने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. खास कृती कार्यक्रमाद्वारे या सर्व घटकांना न्याय देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
पाटबंधारे खात्याच्या कोळकी विश्रामगृह परिसरात आयोजित श्रीराम जवाहर, स्वराज, शरयू, दत्त इंडिया, जरंडेश्वर आणि माळेगाव साखर कारखान्याकडील ऊस वाहतूक ठेकेदार (मुकादम) आणि या कारखान्याकडील अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी धस, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धमुकुमार गोडसे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर पाटील, लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास वायकर, अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी व अॅड. नरसिंह निकम उपस्थित होते.
ऊस वाहतूक ठेकेदार (मुकादम) यांना साखर कारखान्याच्या हमीवर बँका प्रत्येकी ५ लाख रुपये कर्ज देतात, तथापि प्रत्यक्षात ऊसतोड टोळी, वाहतूक कामगारांना कितीतरी अधिक आगाऊ रक्कमा देऊन त्यांना येथे आणावे लागत असते. ठेकेदार (मुकादम) स्वतःच्या घरातील सोने-नाणे विकून प्रसंगी शेती विकून पैसा उभा करतात आणि आपल्या चरितार्थाचे साधन असलेला हा व्यवसाय अधिक फायदेशीर कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडणी वाहतूक कामगारांना असलेली मागणी वाढल्यानंतर या व्यवसायात स्पर्धा वाढली आहे. त्यातून अधिकाधिक आगाऊ रक्कमा देवून या कामगारांची नोंदणी सुरू झाली, ऊस तोड कामगारांनी एकावेळी २/२ ठेकेदार (मुकादम) यांच्याकडून आगाऊ रक्कमा घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात एकाची मागणी पूर्ण होऊ शकली, दुसरा संकटात सापडला आहे. आता त्यांनी दिलेल्या आगाऊ रक्कमा त्यांना परत मिळाल्या पाहिजेत, कारण बँकांचा ससेमीरा त्याच्या पाठीमागे लागला आहे. कामगार न आल्याने यावर्षीचे उत्पन्न बुडाले आहे. पुढील वर्षी व्यवसायाची खात्री राहिली नसल्याने तेे मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून आत्महत्येशिवाय अन्य पर्यायच त्यांच्यासमोर राहिला नसल्याने त्यांना तातडीने न्याय देण्याची आवश्यकता खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली.
ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार (मुकादम) आर्थिक संकटात असल्याने त्याने पुढील वर्षीच्या हंगामातील गाळपासाठी आवश्यक असलेल्या ऊस तोड वाहतूक कामगारांची आगाऊ नोंदणी केली नाही, तर फलटण तालुक्यात यावर्षी तुटणार्या उसाचे क्षेत्र सुमारे १८ ते २० हजार हेक्टर एवढे मोठे आहे. तीच परिस्थिती शेजारच्या तालुक्यात आहे. ऊस तुटला नाही तर साखर कारखाने बंद पडतील. तेथील कामगार अडचणीत येतील. उसाचा पैसा हातात आला नाही तर ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडेल. परिणामी बाजारपेठा ओस पडतील. असे सर्व घटकांसाठी हे मोठे संकट असल्याने यातून तातडीने योग्य मार्ग काढून प्रत्यक्ष अंमलबजावणीद्वारे या सर्व घटकांना दिलासा देण्याची मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. हे संकट केवळ फलटणमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात याची झळ कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऊस वाहतूक ठेकेदार (मुकादम) फसवणूक प्रकरणी फलटण येथे २३० तक्रार अर्ज दाखल झाले असून संपूर्ण जिल्ह्यातील अशा तक्रारींबाबत ठोस कृती कार्यक्रम राबवून फसवणूक झालेल्या मुकादम यांना योग्य न्याय देवून त्यांची रक्कम वसूल होण्याबरोबर यावर्षीच्या ऊस गळीत हंगामात ऊस तोडणी, वाहतूक सुरळीत होईल यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची ग्वाही सातारा जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी यावेळी दिली.
सातारा जिल्ह्यातील संपूर्ण ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आतापर्यंत ऊस वाहतूक ठेकेदार (मुकादम) यांच्या झालेल्या फसवणुकीबाबतच्या तक्रारी जिल्हा स्तरावर दाखल करून घेऊन त्याचा तपास करीत असताना तक्रारींची मोठी संख्या लक्षात घेऊन त्या तक्रारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर दाखल करून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तथापि, ती यंत्रणाही पुरेशी नसल्याने आता पोलीस ठाणे स्तरावर या तक्रारी दाखल करून घेण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दिले.
पोलिस ठाणे स्तरावर तक्रारी दाखल करताना दिलेल्या आगाऊ रक्कमा बँकेच्या माध्यमातून चेक, एनईएफटी, आरटीजीएसद्वारे दिल्या असतील तर त्याबाबत कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केल्यास त्याबाबत अधिक भक्कम पुरावे उपलब्ध होऊन न्यायालयात आपली बाजू अधिक प्रभावीपणे मांडता येणार असल्याचे स्पष्ट करताना अशा तपासाची किंवा अशा गुन्ह्यांची माहिती असणारे पोलिस अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश असलेले स्वतंत्र पथक प्रत्येक पोलिस ठाण्यात एक महिन्यासाठी कार्यान्वित करून या तक्रारी दाखल करून घेणे, तपास करणे आणि दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे सूतोवाच करताना न्यायालय स्तरावर एकादी विशेष बैठक आयोजित करून असे सर्व खटले लोकअदालत स्वरूपात चालविता येतील का? आले तर त्याची कार्यवाही निश्चित करून लवकर न्याय कसा मिळेल, यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी यावेळी दिले.
संशयितांविरुद्ध ठोस कार्यवाहीचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आश्वासन
प्रचलित कार्यपद्धतीनुसार एखाद्या संशयिताबाबत त्याच्यावरील आरोपांची पूर्वकल्पना संबंधित पोलिस यंत्रणेला देवून नंतर कार्यवाही केली जाते, तथापि, येथे त्याबाबत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन त्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे, तसेच संशयित पकडून न्यायालयात हजर केल्यानंतर छोट्या रक्कमेच्या जामिनावर मुक्त होत असल्याने त्याबाबतही योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हा पोलिसप्रमुख यांनी दिले.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धण्यकुमार गोडसे यांनी तपासातील अडचणी विषद केल्या. शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.