शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ आता राज्यपालांना भेटणार नाही, अपमान केल्याची भावना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य , मुंबई , दि .२५: कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यातील शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले. दरम्यान शरद पवारांनी आझाद मैदानावर शेतकऱ्यांना संबोधित करत आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर शेतकरी राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. मात्र आंदोलक शेतकऱ्यांना रस्त्यात अडवण्यात आले.

शेतकरी आंदोलक राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले असले तरीही राज्यपाल एका कार्यक्रमासाठी गोव्याला रवाना झाले होते. यामुळे शेतकरी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याची पाहायला मिळाले. शेतकरी हे राज्यपालांना भेटणार हे राज्यपालांना माहिती असूनही ते गोव्याला पळून गेले असा आरोप संतप्त आंदोकलांकडून करण्यात आला.

आता राज्यपालांना भेटणार नाही शिष्टमंडळ
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे अशी भावना आंदोलकांमध्ये आहे. आता शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार नाही. ज्यांना शेतकऱ्यांचा आदर नाही त्यांना आम्ही भेटणार नाही असेही आंदोकल म्हणाले. राज्यपालांनी शेतकऱ्यांचा मोठा अपमान केला आहे अशी भावना शेतकऱ्यांची आहे.

निवेदन मंचावर फाडले

राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन हे भर मंचावर फाडून राज्यपालांच्या अनुपस्थितीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राज्यपाल हे राजभवनावर नसल्याने शेतकरी शिष्टमंडळ प्रचंड आक्रमक झाले. तसेच राज्यपालांची भूमिका ही शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही शेतकरी शिष्टमंडळाने केला आहे.

मुंबईमध्ये मेट्रो सिनेमा चौकामध्ये शेतकऱ्यांना अडवले

राजभवनाकडे शेतकऱ्यांचा मोर्चा रवाना झाला. मात्र शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवले. आझाद मैदानावर निदर्शन करुन शेतकरी राजभवनाकडे निघाले होते. शेतकरी आंदोलकांना मुंबईमध्ये मेट्रो सिनेमा चौकामध्ये अडवण्यात आले. राज्यपालांना भेटल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका शेतकरी आंदोकलांनी घेतली होती.

काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगतापही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगतापही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
  • राज्यापालांची भेट घेतल्याशिवाय येथून हलणार नसल्याचे आंदोलक म्हणत होते.
  • मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच गोंधळ घातला आहे. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका

आझाद मैदानावरुन अजित नवले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि सचिन सावंतांसह अनेक नेते मोर्चेकऱ्यांसोबत राजभवनाकडे निघाले. या नेत्यांसोबत हजारो मोर्चेकरी राजभवनाकडे निघाले. दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ शेतकऱ्यांना अडवले. यानंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. शेतकरी आंदोलक हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था नाही – पवार

शरद पवार यांनी आझाद मैदानावर येत केंद्र सरकारला फटकारले आहे. ही लढाई केवळ शेतकऱ्यांनी नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे. ज्यांच्या हातातमध्ये सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांविषयी कवडीचीही आस्था नाही असे म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून आंदोलन करत रस्त्यावर बसला आहे. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची चौकशी केली आहे का? असा सवालही पवारांनी उपस्थित केला आहे.

आझाद मैदानावर पोहोचलेले आंदोलक शेतकरी
आझाद मैदानावर पोहोचलेले आंदोलक शेतकरी

पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे का?

तसेच दिल्लीत आंदोलन करत असलेला शेतकरी हा पंजाब आणि हरियाणामधील आहे असे बोलले जात आहे. मात्र पंजाबचा शेतकरी आहे म्हणून काय झाले? पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानी आहे का? असा संतप्त सवालही पवारांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश
शेतकरी आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश

पवारांनी मानले आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार

देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात आक्रमकपणाची भूमिका मुंबईने घेतली, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईतील कष्टकरीवर्ग रस्त्यावर उतरला, यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोक मुंबईला आले आहेत.या सर्वांचे शरद पवार यांनी आभार मानले.

हे केंद्रसरकार भांडवलदारांचे गुलाम आहे – बाळासाहेब थोरात

आजचे शेतकरी आंदोलन अभूतपूर्व आहे, उद्या दिल्लीत ट्रॅक्टर रॅली निघणार आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे भांडवलदारांसाठी, साठेबाजांसाठी, नफेखोरांसाठी आहेत. ते रद्द केलेच पाहिजेत हा आपला एल्गार आहे. हे केंद्रसरकार भांडवलदारांचे गुलाम आहे. असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनात शरद पवारांनी संबोधित केले.
आझाद मैदानावरील शेतकरी आंदोलनात शरद पवारांनी संबोधित केले.

दीर्घकाळ चाललेले आंदोलन म्हणून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे पाहावे लागेल

दिल्लीत लाखो शेतकरी एकवटले असून त्यांनी झाडाचे एक पानही तोडले नाही. इतके अहिंसावादी आंदोलन आजवर झालेले नाही. अनेक आंदोलक थंडीमुळे मरण पावले. तरिही सरकारचा मानवतावाद जागा होत नाही. देशाच्या इतिहासात आतापर्यंत कोणताही वाद न होता दीर्घकाळ चाललेले आंदोलन म्हणून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे पाहावे लागेल. जात, धर्म, प्रांत यावर आंदोलन फोडण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र आंदोलन फुटले नाही असे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सचिव,​हनन मुल्ला म्हणाले.

केंद्र सरकारच्या या असंवेदनशीलतेचा जळजळीत निषेध
शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनावर मोदी सरकारने अश्रुधुराचा वापर केला, हायवे खणले, पाण्याचे फवारे सोडले तरी शेतकरी तिथे ठाण मांडून बसलेत. दीडशे शेतकरी आंदोलनात हुतात्मे झाले. केंद्र सरकारच्या या असंवेदनशीलतेचा आपण आज जळजळीत निषेध करत आहोत- डॉ. अशोक ढवळे,अध्यक्ष,ऑल इंडिया किसान सभा

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल झाले आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत रॅली काढत आहेत.

ते मुंबईतील आझाद मैदानात सभा घेतील. यानंतर ते आझाद मैदान ते राजभवनापर्यंत कृषी कायद्याविरूद्ध मोर्चा काढतील. ज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सामिल झाले.

अखिल भारतीय किसान सभेने ही रॅली आयोजित केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक निवेदनही देणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) महाराष्ट्र शाखेने दावा केला आहे की नाशिकमधील सुमारे 15,000 शेतकरी शनिवारी टॅम्पो, पायी व इतर वाहनांनी मुंबईला रवाना झाले आहेत.

ड्रोनवरुन ठेवली जात आहे नजर
शेतकरी रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षिण मुंबई येथील आझाज मैदान आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसराच्या सुरक्षेची विशेष तयारी केली आहे. त्याशिवाय राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) चे जवान तैनात केले आहेत. या मोर्चावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

असा होता शेतकऱ्यांचा 180 किलोमीटरचा प्रवास
AIKS नुसार, मुंबईसाठी कूच करणाऱ्या शेतकऱ्यांनी रात्री आरामासाठी इगतपुरीजवळच्या घाटनदेवी येथे मुक्काम केला. रविवारी सकाळी शेतकरी कसारा घाटाच्या रस्त्याने मुंबईसाठी रवाना झाले. कसारा घाटापर्यंत काढलेल्या सात किलोमीटर लांब मोर्चामध्ये महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. हा मोर्चा सकाळी नऊ वाजता सुरू झाला आणि 11:30 वाजता संपला. नंतर शेतकरी वाहनांच्या माध्यमातून पुढील प्रवासाला निघाले.

कसारा घाट मोर्चाचे नेतृत्व एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, प्रदेश युनिटचे प्रमुख किसन गुजर व सरचिटणीस अजित नवले यांनी केले. इंडियन ट्रेड युनियन सेंटरशी संबंधित इगतपुरी आणि शाहपूर तहसील कारखानदारांनी (सीआयटीयू) या शेतकर्‍यांचे फुलांचे वर्षाव करुन स्वागत केले.

पवार यांनी केंद्राला दिला होता इशारा
कडाक्याच्या हिवाळ्यात दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांविषयी बोलताना पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला की, जर ते शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. ते म्हणाले होते की सरकारने शेतकर्‍यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.


Back to top button
Don`t copy text!