वाचक-लेखक यांचा मेळ घालतो तो ‘समीक्षक’ – ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ एप्रिल २०२३ | फलटण |
मानवी जीवनात साहित्याला फार महत्त्व आहे. साहित्याचे पैलू समजून घेऊन लिखाण केले पाहिजे. दैनंदिन जीवनात घडणार्‍या घडामोडी संवेदनशील मनाने मांडल्या पाहिजेत. यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. साहित्यात समीक्षेला विशेष महत्त्व आहे. अलीकडील काळात पुस्तकांवर समीक्षापर लेखन होणे आवश्यक आहे. वाचक-लेखक यांचा मेळ घालतो तो ‘समीक्षक’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व ‘सर्जा’कार सुरेश शिंदे यांनी फलटण येथे नाना-नानी पार्क येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांनी आयोजित केलेल्या ‘साहित्यिक संवाद’ या कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी समीक्षक प्रा. विक्रम आपटे, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, लेखिका सौ. सुलेखा शिंदे, रानकवी राहुल निकम, पत्रकार व लेखक विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.विक्रम आपटे यांनी लिहिलेल्या समीक्षकांचे वाचन करून, समीक्षा कशी असावी, याविषयी विवेचन केले. सौ सुलेखा शिंदे यांनी ‘साहित्य’ म्हणजे काय, हे सांगून वाचनाचे महत्त्व सांगितले.

विकास शिंदे म्हणाले की, पुस्तक कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे काय वाचावे व लिहावे, हे समजून घेतले पाहिजे.
राहुल निकम यांनी पुस्तकांचे महत्त्व सांगून ‘मैना’ ही कविता सादर केली. अतुल चव्हाण यांनी ‘खो-खो’ व सौ. अनिता पंडित यांनी ‘नाना नानी बगीचा’ कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.

यावेळी उत्स्फूर्तपणे अ‍ॅड. रोहिणी भंडलकर, नितेश पिसे यांनी मनातील प्रश्न विचारून संवाद साधला व लिखाणाची प्रेरणा मिळाली याचे समाधान व्यक्त केले.

साहित्यिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू सांगून नवसाहित्यिकांनी नवी ऊर्जा व प्रेरणा घ्यावी तसेच समीक्षेचे महत्त्व याविषयी प्रास्ताविकात माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी सांगितले.

यावेळी साहित्यप्रेमी व निसर्ग सोबती ग्रुपचे सदस्य सौ. शीतल नडगिरे, सौ. ज्योती मुजूमदार, अ‍ॅड. मयूर शेरखाने, अ‍ॅड. अश्विनी मोरे, कु. वंदना सूळ तसेच साहित्यप्रेमी यांची उपस्थिती होती.

आभार कवी अतुल चव्हाण यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!