राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’) चे सहकार्य मोलाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्र राज्य उद्योगस्नेही राज्य असून उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर आहेच. महाराष्ट्र हे अमेरिकन उद्योगांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. या पुढील काळातही राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स
(‘AMCHAM’)चे सहकार्य मोलाची भुमिका बजावेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जियो कन्व्हेन्शन सेंटर येथे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’)चे अपेक्स काॅन्क्लेव्ह झाले. यावेळी राजदूत एलिझाबेथ जोन्स, राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष संजय कौल, पश्चिम विभागीय अध्यक्ष सार्थक रानडे, उपाध्यक्ष शैलेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी रंजना खन्ना, सदस्य काकू नखाते, व अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स (‘AMCHAM’)चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. गती शक्ती योजनेमुळे मोठे बदल घडणार असून याव्दारे उद्योग क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे. इज आॅफ डुईंग बिझनेसमुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्ट अप्स व युनिकाॅर्नची राजधानी

महाराष्ट्र राज्य आता नाविन्यतेची, स्टार्ट अप्स व युनिकाॅर्नची राजधानी बनली आहे. पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.
‘स्पीड आॅफ ट्रॅव्हल’ आणि ‘स्पीड आॅफ डेटा’ यावर अधिक भर देण्यात येत असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गामुळे राज्यात क्रांतिकारी बदल

समृद्धी महामार्गामुळे राज्यात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. या महामार्गामुळे 14 जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नागपूर आता ‘जेएनपीटी’शी 10 तासात जोडले जात आहे. आता हा महामार्ग सेमीफास्ट रेल्वे आणि कार्गो रेल्वेनेही जोडला जाणार असून या महामार्गामुळे डेटा सेंटर इको सिस्टीम आता उर्वरित राज्यातही उभी राहणार आहे. 10 हजार गावांमध्ये अॅग्री बिझनेस सोसायटी उभारण्यात येणार असून शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जात आहे.

राज्यात हरीत ऊर्जा वापराला चालना 

पर्यायी इंधन क्षेत्रातही राज्य अग्रेसर असून राज्यात हरीत ऊर्जेला अधिक चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
सौर व पवन ऊर्जेला तसेच एलएनजी व कोल गॅसिफिकेशनला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत असून याव्दारे शेतकऱ्यांना दिवसाही शेतीसाठी वीज उपलब्ध राहणार असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.

राजदूत एलिझाबेथ जोन्स, म्हणाल्या, भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण सहकारी आहे. भारत देश सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून जागतिक स्तरावर भारतासाठी विविध क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. भारतातील उद्योगांशी दीर्घकालीन सहकार्य करण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचेही जोन्स यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!