स्थैर्य,नवी दिल्ली, दि.१५: जगप्रसिद्ध इलेक्ट्रॅनिक कार कंपनी टेस्लाने नवीन वर्षाची सुरुवात करत जानेवारी 2021 मध्ये भारतात प्रवेश केला आहे. प्रवेश केल्यानंतर या कंपनीने भारतात टेस्ला इंडिया मोटर्स एँड एनर्जी या नावाने रजिस्टेशन केलं आहे. कंपनीने भारतात नवीन गाड्यांची निर्मिती चालू करण्याचं ठरवलं असून याची सुरुवात कर्नाटकची राजधानी बंगळुरुपासून होणार आहे.
राज्यातील टुमकुरमध्ये इंडस्ट्रीयल काॅरिडाॅर सुरु करण्यात येणार आहे, याठिकाणी टेस्ला कंपनी आपलं एक युनिट टाकणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी दिली आहे. या युनिटसाठी 2.8 लाख रोजगार लागणार असून कोरोना काळात नोकरी गेलेल्या लोकांसोबत नोकरी शोधणाऱ्या लोकांना ही मोठी सुवर्णसंधी आहे, असंही येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
टेस्ला कंपनी भारतात माॅडेल 3 सेडान या गाडीसोबत प्रवेश करण्याच्या तयारीत असून तनेजा, वेंकटरंगम, श्रीराम देवीड आणि जाॅन फिस्टीन यांना टेस्ला इंडियाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
मागील वर्षी टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मास्क यांनी 2021 मध्ये भारतात प्रवेश करण्याची योजना असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं. मात्र त्याआधीही टेस्ला भारतात येणार असून 2021 च्या सुरुवातीलाच ती ऑपरेशन सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.