घुसखोरीचा मोठा डाव उधळला


स्थैर्य, जम्मू, दि. 29 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडून कुरापती सुरू असून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दलाकडून घुसखोरीसाठी वापर करण्यात येणार्‍या जमिनीतील भुयारी मार्गांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. शोध घेत असताना जवानांना सीमेवर जमिनीत 25 फूट खोलीवर 150 मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. त्यामुळे घुसखोरीचा मोठा कट लष्कराने उधळून लावला आहे.

सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेलगत भुयारी मार्गांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरू असताना बीएसएफला शनिवारी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात मोठा बोगदा आढळून आला. हा बोगदा जमिनीत 25 फूट खोलीवर असून त्याची लांबी 150 मीटर असल्याचे लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

या भुयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही सापडल्या आहेत. या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी 400 मीटर अंतरावर असल्याचेही लष्कराने म्हटले आहे. पाकिस्तानातून येणारे दहशतवादी अशा भुयारी मार्गांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करतात. बोगदा सापडल्याने लष्कराला घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावण्यात यश आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!