दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून १३ ऑगस्ट रोजी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक तसेच कर्तव्यावर रुजू असलेले पण सध्या सुट्टीनिमित्त गावी आलेले सैनिक बांधव यांना विद्यालयाने पत्राद्वारे निमंत्रण देऊन रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी बोलवले होते. या कार्यक्रमास पंचवीस आजी-माजी सैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रारंभी गीत गायनाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक सौ. वनीता लोणकर यांनी केले, तर उपप्राचार्य श्री. नितीन जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्प देवून प्राचार्य श्री. सुधीर अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य श्री. सुधीर अहिवळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. जे. एस. काकडे यांनी इंडियन एअरफोर्समध्ये असणारे नियम, शिस्त व अनुभवलेले प्रसंग यांचे वर्णन अत्यंत उत्तमपणे मांडले. तसेच, प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सर्व विद्यार्थिनींनी औक्षण करून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या देशाच्या जवानांना बांधल्या. तसेच यावेळी रक्षाबंधन साजरा करण्यामागील कथा कु. शिंदे टी. व्ही. यांनी सांगितली, तर श्री. रणवरे सर यांनीही जवानांचे कार्य स्पष्ट केले. याप्रसंगी अक्षय खलाटे याने लिहिलेल्या पत्राचे सर्वांसमोर वाचन करण्यात आले.
कार्यक्रमास हवालदार श्री. सदाशिव केंजळे, नाईक सुभेदार श्री. दिलीप भिसे, श्री.. संदेश गरूड, श्री. हनुमंत हास्पे, श्री. स्वप्निल बर्गे व वॉरंट ऑफिसर इंडियन एअरफोर्सचे श्री. जे. एस. काकडे. (माजी विद्यार्थी), नाईक कैलास ठणके, शिपाई अनिल पखाले, नाईक सुभेदार श्री. दिलीप मिसे, हवालदार पवार आदी प्रमुख उपस्थित होते.