नीरा-देवघर प्रकल्पाच्या फलटण ते माळशिरस मुख्य बंदीस्त नलिकेच्या तिसर्‍या टप्प्याची निविदा प्रसिद्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२३ | फलटण |फलटण, माळशिरस, सांगोला तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा-देवघर प्रकल्प आहे. ४० वर्षे झाली या तालुक्याच्या पाणीप्रश्नावर सत्ताधार्‍यांनी राजकारण केले आहे. अगदी मृतप्राय झालेल्या या योजनेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवसंजीवनी दिली. फक्त मान्यताच नाही तर निधीही दिला. माढा लोकसभेतील जनतेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा महत्त्वाकांक्षी नीरा-देवघर प्रकल्प आहे. आज नीरा-देवघर प्रकल्पाच्या मुख्य वितरण व्यवस्थेच्या कॅनॉलची निविदा प्रसिद्ध झाली. या कामासाठी एकूण १८९८८.०६ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील तिसर्‍या टप्प्याची किमी ७७ ते ८७ ही निविदा प्रसिद्ध झाली आहे; अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, या कामामुळे फलटण ते माळशिरस तालुक्याकडे जाणार्‍या वाहिनीचे काम पूर्ण होणार आहे. हे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे या वर्षाअखेरपर्यंत माळशिरसच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचले जाणार आहे. या कालव्यामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस व पंढरपूर-सांगोल्यातील काही भागाला पाणी उपलब्ध होऊन या भागाचा कायमस्वरूपीचा दुष्काळ संपणार आहे.

या तिन्ही तालुक्यातील गावातील लोकांना याचा फायदा होईल. माझ्या व मतदारसंघाच्या दृष्टीने हा भाग्याचा एक क्षण आहे. कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी हा दुष्काळ संपविण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते आज पूर्ण होताना दिसत आहे. फलटण तालुक्यातील गावांना याचा लाभ होणार आहे. गेली अनेक वर्ष या तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत; परंतु मी खासदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठका घेऊन यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन आज निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे या तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही. खासदार झाल्यानंतर या तालुक्यातील ‘इंच ना इंच’ जमीन भिजवण्याचे हे स्वप्न मी पाहिलं होतं, ते आज राज्य सरकारने पूर्ण केल्याने आम्हाला आनंद होत आहे. या तालुक्यातील जनता फलटण तालुक्यात तीन कॅनॉल जाताना पाहणार आहे, असे स्पष्ट मत खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील नवीन तरुण पिढी ही रोजगारासाठी आता मुंबई-पुण्यामध्ये नोकरीला जाणार नाही. स्वतःच्या शेतीबरोबरच व्यवसायसुद्धा आता आपल्या तालुक्यामध्ये करताना दिसणार आहे. त्यामुळे या तालुक्यात हरितक्रांतीबरोबरच आर्थिक क्रांती सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर शेतीबरोबरच युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ही मत खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!