
तरडगाव ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षण जाहीर झाले आहे. सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित असल्याने राजकीय समीकरणे बदलली असून आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
स्थैर्य, तरडगाव, दि. १४ जून : फलटण तालुक्यातील तरडगाव ग्रामपंचायतीची आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. एकूण १५ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने गावात राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे.
प्रभागरचना आणि आरक्षण निश्चिती
तरडगावची एकूण लोकसंख्या ७ हजार ३३७ इतकी आहे. नवीन रचनेनुसार गावात ५ प्रभाग असून १५ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. एकूण १५ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १ जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ४ जागा आणि उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने आता या पदावर कुणबी प्रमाणपत्र असलेला उमेदवार संधी मिळवणार की मूळ ओबीसी प्रवर्गातील उमेदवार विराजमान होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बदललेल्या सत्तासमीकरणांची उत्सुकता
तरडगाव हे माजी आमदार दीपक चव्हाण यांचे गाव म्हणून ओळखले जाते. यापूर्वी फलटण तालुक्यात राजे गटाची एकहाती सत्ता असताना तरडगाव कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र, आता तालुक्यातील राजकीय परिस्थिती आणि सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत हे गाव माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राहणार की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाला कौल देणार, याकडे संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
