‘स्वराज ग्रीन पॉवर’च्या गळीत हंगामाचा ताराराजेंच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण शुभारंभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

उपळवे येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ताराराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला.

स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑक्टोबर : उपळवे येथील ‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’च्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कारखान्याचे बॉयलर पूजन आणि पारंपरिक मोळीपूजन कारखान्याच्या संचालिका कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ‘स्वराज फाउंडेशन’च्या अध्यक्षा ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याच्या विस्तारवाढीच्या माध्यमातून गाळप क्षमतेत वाढ करण्यात आली असून, त्यादृष्टीने आवश्यक ती सर्व तांत्रिक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वाढीव गाळप क्षमतेनुसार ऊस गाळपाचे अचूक नियोजन, यंत्रसामग्रीची सज्जता आणि ऊस वाहतूक व तोडणी व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे.

संपूर्ण कार्यक्षेत्रात ऊसतोडणी यंत्रणा मोठ्या संख्येने दाखल झाल्याने यंदाच्या गळीत हंगामाला प्रचंड वेग मिळण्याची खात्री आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणणे, ऊस वाहतुकीचे नियोजन सुरळीत ठेवणे आणि गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणे, या दृष्टीने कारखाना प्रशासनाने केलेल्या तयारीची संचालिका ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

शेतकरी हिताला कायम प्राधान्य देत कारखाना व्यवस्थापनाने नवरात्र आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या योजनेंतर्गत ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन उसामागे एक किलो साखर सवलतीच्या दरात यापूर्वीच उपलब्ध करून देत त्याचे वाटप सुद्धा संपन्न झाले आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठा आधार मिळणार असून, शेतकरी आणि कारखाना यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

पारंपरिक मोळीपूजनाने सुरू झालेल्या या गळीत हंगामाच्या निमित्ताने संपूर्ण कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव गाळप क्षमता, सक्षम ऊसतोडणी यंत्रणा आणि नियोजनबद्ध कामकाजाच्या बळावर यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विविध खात्यांतील अधिकारी व कर्मचारी, शेती विभागाचे कर्मचारी, ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!