स्वातंत्र्यवीर सावरकरांना आधी भारतरत्न द्या!; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी


दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । मुंबई । भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात येणार आहे. रविवारी ती यात्रा डोंबिवलीतून निघणार आहे. त्यात शिवसेनेचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. मनसेने मात्र यातून अंग काढून घेतले आहे. आमदार राजू पाटील यांच्या मते, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आधी भारतरत्न जाहीर करा आणि मगच गौरवयात्रा काढा. ते जाहीर न करता केवळ गौरवयात्रा काढून काय हाेणार? हिंदुत्वाची वातावरणनिर्मिती होईल. त्या पलीकडे काय? केंद्रात नऊ वर्षे भाजप सत्तेत आहे. त्यामुळे आधी सावरकर यांना भारतरत्न जाहीर करावे, मगच यात्रा काढावी, अशी मनसेची भूमिका असल्याची चर्चा सुरू आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही शशिकांत कांबळे यांनी  दिले. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल.  ६ एप्रिल रोजी  भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!