
स्थैर्य, फलटण, दि. २६: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य कुटुंबातील कोरोनाबाधित येत असतात. या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या व्हावा म्हणून उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी ९२ लाख २८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी आणण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केलेले होते. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त होणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) या योजनेतून कार्यकारी अभियंता यांत्रिकी यांना दिलेल्या संदर्भीय पत्राद्वारे प्रशासकीय मान्यता देण्याचा आदेश दि. २१ एप्रिल रोजी पारीत केला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दि. २५ एप्रिल अखेर १२४९९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यापैकी २९९ जण कोरोनाचा बळी ठरले आहेत. ९३९८ जण कोरोनातुन मुक्त झालेले आहेत. उर्वरित २८०२ जणांवर विविध खाजगी, शासकीय रुग्णालयांत तर काहींना गृह विलगिकरणाद्वारे उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने दिलेली आहे.
दरम्यान, या कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी विशेषतः ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशांसाठी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे विविध माध्यमातून मदत करत आहेत.