
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । फलटण । साखरवाडी विद्यालय हे ग्रामीण भागात असूनही या विद्यालयाचे पन्नास हून अधिक विद्यार्थी क्रीडा व शासकीय परीक्षा देऊन आय.ए.एस. सारख्या उच्च शासकीय पदावर कार्यरत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे साखरवाडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी साखरवाडी येथे पारेतोषिक वितरण समारंभात सांगितले.
साखरवाडी विद्यालयाचे ७७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रल्हादराव साळुंखे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी विभागीय वन अधिकारी, पुणे विभाग सारीका जगताप, दंतशास्त्र विभाग प्रमुख, यशवंतराव स्मृती रुग्णालयचे डॉ. यशवंत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, संचालक विक्रम आपटे, राजेंद्र शेवाळे, राजेंद्र भोसले, कौशल भोसले, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच अक्षय रुपनवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व सचिव सौ. उर्मिला जगदाळे यांनी प्रमुख उपस्थितांचे बुके देऊन स्वागत केले व प्रमुख मान्यवरांना भेटवस्तू, शाल, बुके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेच्या स्पर्धा परीक्षा क्रीडा शालांत परीक्षा निकाल, खोखो खेळ व स्कॉलरशिप या परीक्षांचा अहवाल वाचन करुन धावता आढावा घेतला.
यावेळी बोलताना सारीका जगताप यांनी सांगितले की, खो-खो सारखा खेळ साखरवाडीने शून्यातून निर्माण केला. मी या खेळाच्या जोरावरच शासकीय परीक्षा देऊन कार्यरत आहे. या शाळेने दादोजी कोंडदेव, राणी लक्ष्मीबाई तसेच छत्रपती पुरस्कार या सारखे पुरस्कार या विद्यालयाने पटकावले आहेत व शाळेचे नाव उज्ज्वल केले. अभ्यास व सराव सातत्यपूर्ण केल्यावर यश लोटांगण घालून येते असे त्यांनी सांगितले. त्यांनी शाळेस लॅपटॉप व रु.१०,०००/- ची शिष्यवृत्ती जाहिर केली.
डॉ. यशवंत इंगळे यांनी सांगितले की, आम्हाला या शाळेत प्रवेश मिळणे अवघड होते परंतु या शाळेत प्रवेश मिळवून या संस्कारांनी आज घडलो आहे. विद्यार्थ्यांनी खेळ, स्पर्धा यात भाग घेऊन उज्ज्वल यश संपादन करावे असे सांगितले. यावेळी शाळेतून सेवा निवृत्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील कृतीशील शिक्षक म्हणून भीमकांत कुंभार व मंजुषा रेवाडीकर यांनी सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श लेखनिक गोपाल कांबळे, आदर्श सेवक गणेश मदने व हुषार व कृतीशील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाळेचा प्रकाश या नियतकालिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पाहुण्यांची ओळख हरीदास सावंत यांनी करुन दिली नंतर मार्च २२ शालांत परीक्षा व विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण देऊन गौरविण्यात आले. या समारंभास माजी मुख्याध्यापक प्रल्हाद बोंद्रे, ताराचंद जगताप, संपत चांगण, प्राथमिकचे संदिप चांगण, बालक मंदिराच्या सौ. विद्या चांदगुडे व पुणे येथील माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल भोसले यांनी केले. आभार नितीन शिंदे यांनी मानले.
यावेळी बालक, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी करमणूकीचा बहारदार कार्यक्रम सादर केला. यामध्ये ६५० चे वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. साखरवाडी व परीसरातून प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.