सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करणार; फलटण शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १८ एप्रिल २०२३ | फलटण | आगामी काळात येणार्‍या सण-उत्सवाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर दोन गट, समाज, जात-धर्म यांच्यात तेढ निर्माण होईल, अशा वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने फलटण शहर व तालुक्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, आगामी काळात येणार्‍या सण-उत्सवाच्या अनुषंगाने सोशल मीडियाचा वापर करीत असताना दोन समाज-दोन गट, जात-धर्म यामध्ये तेढ किंवा वाद होईल, अशा कोणत्याही पोस्ट व्हाट्सअ‍ॅप ग्रुप, सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात येऊ नयेत. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणार्‍यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात ‘ग्रुप अ‍ॅडमिन’ यांनी ‘ओन्ली फॉर अ‍ॅडमिन’ ही सेटिंग करून वादग्रस्त विधान किंवा पोस्टमुळे समाजात तेढ, कायदा व सुव्यवस्था यास बाधा निर्माण होईल असे मेसेज पोस्ट करण्यात येऊ नयेत, याबाबतची जबाबदारी ग्रुप अ‍ॅडमिनची राहील, अन्यथा सदर वादग्रस्त ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट मेसेज, फोटो प्रसारित करणार्‍यास ग्रुप अ‍ॅडमिनची मूकसंमती होती, असे गृहित धरून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सायबर सेलचे अशा पोस्टवर २४ तास लक्ष आहे.

सर्व नागरिकांना फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असे फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले आहे.

Back to top button
Don`t copy text!