
स्थैर्य, वाई, दि.५: धोम धरणाच्या खालील परिसरातील व्याहळी, धोम एकसर पसरणी या गावांमध्ये महसूल विभागाच्या कृपाहस्ताने जलपर्णी काढण्याच्या नावाखाली वाळू उपसा करणाऱ्यांवर येत्या २ दिवसांत कारवाई न झाल्यास ७ डिसेंबर पासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा युवानेते विकास शिंदे यांनी दिले आहे.
वाई तालुक्यातील धोमधरणाच्या खालील परिसरात अवैध वाळू उपसा करून सरकारी मालमत्तेची चोरी व स्थानिकांना राजकीय इसमांकडून व गुंडाकडून दमदाटी सुरू असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते तथा युवानेते विकास शिंदे यांनी केला आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे,धोम धरणाच्या परिसरात जलपर्णी काढण्याच्या नावाखाली अवैध बेकायदेशीर रित्या वाळू उपसा (सरकारी मालमत्तेची चोरी) संदर्भात अर्ज ११/०८/२०२० रोजी केला होता.सदरील वाळू उपसा त्वरीत न थांबल्यास दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे मी आत्मदहन करणार होतो. मात्र वाई तहसील कार्यालयाचा दि. १४/०८/२०२० जावक नं. क्र. जमिन-२ कावि ५३९ ।२०१० ने दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे लेखी हमीपत्र प्राप्त पत्र व आत्मदहना पासून परावृत्त होण्यास विनंती केल्याने सदरील आत्मदहन रद् करणेत आले.मात्र तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वाई यांच्या मार्फत वाळू उपसा (सरकारी मालमत्तेची चोरी) व वाळू उपसाकरणेकामी वापरण्यात येणारे दोन पोकलॅन्ड, २ जेसीबी, १२ टॅक्टर यांचेवर व सदरील व्यक्तिवर आज तागायत कोणत्याही प्रकारची कायदेशीर व फौजदारी कारवाई झाली नाही. तसे कोणतेही पत्र मला कार्यालयाकडून प्राप्त झाले नाही. त्याउलट दि. २५ नोव्हेंबर २०२० पासून पुन्हा अवैध वाळू उपसा (सरकारी मालमत्तेची चोरी) बेघडकपणे राजकीय दबाव व महसूल विभागाच्या सहमतीने सुरू झाली आहे. यावेळेस कार्यालयामार्फत सांगण्यात येत आहे की सदरील धोम धरणाच्या खालील नदी पात्रात वाढलेली जलपर्णी काढण्याचे सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र त्याठिकाणी जलपर्णीच्या नावाखाली महसूल विभागाच्या अभयाने दिवस-रात्र अवैध वाळू उपसा (सरकारी मालमत्तेची चोरी) सुरू आहे. सदरील वाळू उपशा करिता ३ पॉकलेन, ३ जेसीबी, ५ टॅक्टर व २० डंपर च्या साहयाने सुरू आहे. मात्र महसूल विभागाकडे सदर जलपर्णी काढण्याकरिता कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना वा आदेश मागितला असता उपलब्ध वा प्राप्त झाला नाही. सदरील कृष्णा पात्र हे जिल्हाधिकारी कार्यालय व धोम पाटबंधारे यांच्या अधिकारात येत आहे. तरी सदरचा प्रकार आपणाकडून त्वरीत बंद न झाल्यास दि. ०७ डिसेंबर २०२० पासून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रालय, मुंबई येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल,असा इशारा देऊन विकास शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून योग्य ती दंडात्मक कारवाई करून अवैध वाळू उपसा त्वरीत थांबवावा व सदरील व्यक्तिवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या वाई महसूल विभागाच्या अधिकारी, सर्कल, तलाठी, यांच्यावर योग्य ती दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी अशी आग्रही मागणी देखील शिंदे यांनी शेवटी केली आहे.
जिल्हाधिकारी सातारा यांना केलेल्या या निवेदन अर्जासोबत शिंदे यांनी दि. ११/०८/२०२० चा अर्ज, तहसिदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वाई प्राप्त अहवाल, सदरील अवैध वाळू उपसाचे रंगित छायाचित्र जोडले आहे.
निवेदनाच्या प्रति महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पुणे विभागाचे आयुक्त,पोलीस अधिकारी,उपविभागिय पोलीस अधिकारी,वाईच्या प्रांतअधिकारी,तहसिलदार ,पोलीस निरीक्षक, इंटरनॅशनल हयुमन राईटस् असोशिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष,दक्ष नागरिक फाऊंडेशन,चे राज्याचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आल्या आहेत.