संपूर्ण फलटण तालुका ओलिताखाली आणणार्‍या खासदार रणजितसिंह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा – प्रल्हादराव साळुंखे-पाटील

भाजपाच्या वतीने दुष्काळी भागातील जनतेशी ‘संवाद दौरा’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
दुष्काळी भागातील शेतकरी हा हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी अहोरात्र झटत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणून खर्‍या अर्थाने संपूर्ण फलटण तालुका ओलिताखाली आणण्यासाठी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नीरा-देवघर योजना पूर्णत्वाचा विडा उचलून प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार्‍या आपल्या हक्काच्या खासदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून पिढ्यान्पिढ्या अडकलेल्या फलटण तालुक्यातील ५७ गावांचा दुष्काळ संपून नीरा-देवघरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भाजपाच्या वतीने दुष्काळी भागातील जनतेशी ‘संवाद दौरा’ आयोजित केला आहे. या दौर्‍यात साळुंखे-पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी अ‍ॅड. नरसिंह निकम, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, बजरंग गावडे, अशोकराव जाधव, अमोल सस्ते, महादेव पोकळे, तुकाराम शिंदे, सुशांत निंबाळकर व इतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले की, फलटण तालुक्यातील नीरा-देवघरमधील हक्काचे पाणी मिळू नये यासाठी अनेकांनी हा प्रकल्प रखडवला व आपली सत्तेची व मंत्रीपदाची खुर्ची शाबूत ठेवली. त्यांनी सतत शेतकर्‍यांच्या माथी दुष्काळ मारला व त्यांनी निवडणुका आल्या की पोकळ घोषणा व थापा मारल्या. मात्र, आता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार आपला दुष्काळी कलंक हटविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. आज या नीरा-देवघरचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तब्बल ३२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येणार्‍या काळात हा प्रकल्प पूर्ण होऊन आपल्या ५७ गावात खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती होणार आहे. ज्यांनी आपल्याला आपल्या हक्काचे पाणी दिले, अशा पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी या मेळाव्यात केले आहे.

या मेळाव्याला शेकडो नागरिक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!