संसदेत माढ्याच्या खासदाराचे अभ्यासपूर्ण भाषण कधीही ऐकायला मिळाले नाही : आमदार महादेव जानकर


दैनिक स्थैर्य | दि. 17 फेब्रुवारी 2024 | फलटण | बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे संसदेत अभ्यासपूर्ण भाषण नेहमीच बघायला मिळाले आहे. परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहेत; त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण कधीही बघायला मिळाले नाही; असे मत माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

कोळकी, फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार महादेव जानकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार जानकर म्हणाले की; आता असलेले माढा लोकसभेचे खासदार हे एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते कधीही नेता होवू शकणार नाही. देशाच्या सर्वोच्च सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करायला ही क्षमता लागते; ते कोणीही करू शकत नाही. माझा बाप खासदार, आमदार किंवा मंत्री नव्हता. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत राष्ट्रीय समाज पक्ष तळागळात पोहचवण्याचे काम गेल्या 15 वर्षात आपण सर्वांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्ष अशी निवडणूक होणार आहे. येणाऱ्या लोकसभेसाठी फलटण व माळशिरस मधील नेत्यांचे आशीर्वाद मला नक्की मिळणार आहेत. मागे विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने फलटणकरांना आपण मदत केली होती; आता येणाऱ्या लोकसभेसाठी फलटणकर नक्कीच त्याची परतफेड करतील; असेही आमदार जानकर यांनी व्यक्त केले.

आताची भारतीय जनता पार्टी ही काँग्रेस पार्टी झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत; त्यांना संधी न देता काँग्रेसमधून आलेल्यांना संधी देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. जर खरच भारतीय जनता पार्टीला त्यांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यायचे असतील तर आज अशोक चव्हाण यांना आज संधी दिली नसती; असे मत यावेळी आमदार जानकर यांनी व्यक्त केले.

राजकारण हे वाईट नाही. घरामध्ये जर दोन मुले असतील तर एकाला जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक असे बनवा व एकाला राजकारणात नक्की उतरवा. तरच आताचे राजकारण बदलू शकतो. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आता असा विचार करणे गरजेचे आहे; असेही जानकर यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना आमदार जानकर म्हणाले की; भारतीय जनता पार्टीसोबत जाताना गोपीनाथ मुंडे यांना वडील मानून आम्ही कामकाज केले आहे. आम्ही त्यांची मुले असल्यासारखी आम्ही काम करत होतो. परंतु भारतीय जनता पार्टीने आमच्या पक्षासोबत नेहमीच गद्दारी केली. दौंडचे उदाहरण समोर आहे; आयत्यावेळी त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह काढून भारतीय जनता पार्टीचे चिन्ह त्यांनी लावले.

माझे शिक्षण जे झाले आहे ते मेरिट वर झाले आहे. कुणाच्याही वशिल्यावर आमचे शिक्षण झाले नाही. आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय काँग्रेसवर आता राष्ट्रीय समाज पक्ष अवलंबून नाही. आम्ही संपूर्ण राज्यात स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस ह्या एकाच पक्षाच्या दोन बाजू आहेत; असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण हे नक्कीच मिळाले पाहिजे परंतु आता असणाऱ्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे. आगामी काळात धमकीला उत्तर हे धमकिनेच मिळणार आहे. परंतु या मताचे आपण नाही. बुद्धीने जग जिंकता आले पाहिजे.


Back to top button
Don`t copy text!