स्थैर्य, सातारा, दि ११ : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुह्यांमध्ये पकडलेला संशयित कैदी करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या संशयिताच्या संपर्कात आलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांसह सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्या असल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला असून आता पोलीस ठाण्यात आणखीन काळजी घेण्यात येत आहे.
एकतर लॉकडाऊनच्या काळापासून जवळपास तीन महिने रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांना संसर्गाची प्रचंड भीती होती. मात्र पोलिसांनी निडरपणे लॉकडाऊन काळातील बंदोबस्त निभावला. या काळात करोना रुग्णांना दवाखान्यात पोहोचवण्याची कामगिरी करण्यापासून ते क्वांरटाईनवर लक्ष ठेवणे तसेच नवीन आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारीही पोलिसांनी पार पाडली.
या सर्व काळात सातारा तालुका पोलीस ठाण्याचा कोणीही कर्मचारी बाधित झाला नाही. मात्र एका गुन्हय़ात पकडलेल्या संशयिता ताब्यात घेतल्यानंतर व त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची तारांबळ उडाली होती. या कैद्याच्या सहवासात आलेल्या या पोलिस कर्मचाऱ्यांची करोना टेस्ट करण्यात आली. मात्र या 12 ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांच्यासह सातारा पोलीस ठाण्यामध्ये काम करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.